मनोगताचा वाढदिवस पारंपरिक मराठी तिथी प्रमाणे असावा असे वाटते. तसेच एखाद्या पारंपरिक सणाशी संलग्न असेल तर उत्तमच.
थोडा पुढे जाऊन विचार केला तर मनोगत हे वटवृक्षासारखेच आहे. अनेक प्रकारचे लेख, कविता, चर्चा... त्यांना फुटणारे अनेक प्रतिसाद. त्या प्रतिसादांना फुटणारे अनेक प्रतिसाद. त्यातल्या काही प्रतिसादांतून तयार होणारे नवीन लेख... यांचे अव्याहत चक्र.
मनोगतावरचे सदस्य आणि पाहुणे म्हणजे या वटवृक्षाच्या आश्रयाला येणारे नानाविध पक्षी. काही नुसते येऊन उडून जातील तर काही घरटी बांधतील. काही स्थानिक तर काही स्थलांतरी . एकाची कामाची वेळ तेंव्हा दुसऱ्याची झोपायची वेळ. एखादी चिमणी येऊन चिव चिव करून जाईल, एखादा चिमणा दिवसभर ये जा करेल, तर एखादी घार एखादा, गरूड दिवसभर घिरट्या घालेल, एखादा मोर त्याच्या रंगीबेरंगी पिसाऱ्याचे चित्र दाखवेल, एखादा कोकीळ दिवसभर गाणे गाईल, तर एखादा क्रौंच झाडाच्या शेंड्यावर बसून राहील, सुतारपक्षी टकटक करून हैराण करेल पण किडे खाईल, एखादे घुबड रात्रभर पहारा देईल. वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या विचाराचे पक्षी. मुख्यतः आपापल्या थव्यात रमणारे. पण तरीही एकमेकांशी नातं असणारे आणि नसणारेही.
तसेच या पक्ष्यांच्या मनात वटपौर्णिमेशी संलग्न असलेली वृक्षाच्या चिरकालत्वाची भावना. हा वृक्ष वाढावा, त्याला दीर्घायुष्य लाभावे, रोगराईला अथवा वृक्षतोडीला बळी पडू नये म्हणून रोज अजाणतेपणी मनोमन होणारी प्रार्थना. वृक्ष लावणाऱ्याला आणि निगा राखणाऱ्याला रोज मनोमन दिले जाणारे दुवे. सगळे अगदी छान जुळून आल्यासारखे वाटते.
प्रशासकांच्या सदस्यत्वाच्या कालावरून आणि त्यांच्या वाटचालीतल्या सर्वात पहिल्या लेखावरून २२ जून (२००४) हा मनोगताचा वाढदिवस असावा हे अनुमान आम्ही काढले. मनोगताचे बारसे १० ऑगस्ट ला झाले.
ग्रेगोरीयन दिनदर्शिकेप्रमाणे आपल्या सणांचा विचार करता वटपौर्णिमा जून च्या आसपास येते.
हे सगळे लक्षात घेता वटपौर्णिमा हा मनोगताच्या वाढदिवस म्हणून सर्वोत्तम दिवस वाटतो.