श्री. विक्रम गोखले यांचे अभिनंदन.
श्री. गोखले हे मराठी (आणि हिंदीही) चित्रपटांतील आणि मराठी रंगभूमीवरील एक उत्कृष्ट अभिनेते आहेत याबाबत वादच नाही. याशिवाय एक उत्तम उद्योगपती अशीही त्यांची ओळख ह. मो. मराठ्यांच्या 'एक माणूस-एक दिवस' या पुस्तकातून होते. सामान्यतः कलाकार म्हटला की तो कलंदर, कफल्लक, व्यवहारशून्य असावा आणि त्याला त्याच्या जीवनाचा उत्तरार्ध विपन्नावस्थेत काढावा लागावा ( भगवानदादांपासून अगदी परवा पाहण्यात आलेल्या मुबारक बेगमपर्यंत अनेक उदाहरणे) हा दंडक श्री. गोखले यांनी मोडून काढला आहे. पैसा मिळवणे याबाबतीत कोणताही गंड नसलेला हा अभिनेता-माणूस आहे. एक मराठी माणूस म्हणून हे विशेषच म्हणावे लागेल. आपल्या कणखरपणानेही श्री. गोखले कायम प्रकाशात राहिले आहेत. प्रेक्षागारात नाटक सुरू असताना  प्रेक्षकांनी  त्यांचे भ्रमणध्वनी बंद ठेवावेत अशी सूचना नाटकाच्या आरंभी करुनही प्रवेश सुरू असताना एक भ्रमणध्वनी वाजल्यानंतर स्वतःच्याच थोबाडीत मारून घेणारा हा माणूस आहे.
श्री. पाटील यांच्या लिखाणातील 'विक्रमजी' हा उल्लेख काहीसा खटकला. 'श्री. विक्रम गोखले ' हे त्या मानाने (मला) बरे वाटले. 'श्री. विक्रम गोखल्यांचे मनःपूर्वक अभिनंदन' असे महेश यांनी म्हटले आहे, तेही खटकत नाही. असो.