श्री. राव यांचे 'विक्रमजी' उल्लेखाबद्दलचे मत अमान्य करण्यासारखे नाहीच. कदाचित जालीय लिखाणाचे काही संकेत मी पाळत असल्याने नैसर्गिकरित्या 'जी' असे टंकले गेले आणि मग लिखाण पाठविण्यापूर्वी परत एकदा वाचताना त्यात खटकले नसल्याने तो उल्लेख तसाच राहिला. पण आता पटते की 'विक्रम गोखले' मध्ये जी आपुलकी प्रतीत होते ती विक्रमजी मुळे काहीसे अंतर वाढविणारी भासते.
व्यवहारी रोखठोक स्वभावाने न राहिल्याने मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील पडद्यावरील आणि पडद्यामागील अगणित कलाकार आणि कामगार कसे आणि कोणत्या पातळीपर्यंत भिकेला लागले आहेत त्याची उदाहरणे कोल्हापूरात डझनांनी सापडतात. त्याबद्दल लिहिण्याचे हे ठिकाण नाही, पण या निमित्ताने विक्रम गोखले यानी तुकोबा म्हणतात त्यानुसार "जोडिनिया धन उत्तम व्यवहारे...." वर्तन ठेवून या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे हे श्री. राव यानी सांगितले ते सत्यच.
कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृहात 'एका लग्नाची गोष्ट' चा प्रयोग चालू असताना भ्रमणध्वनी वाजला म्हणून प्रशांत दामले संतापून कविता लाड यांच्यासह मंचावरून रंगपटाकडे निघून गेले होते. त्यानीही प्रयोगापूर्वी ".... असे झाले तर मी प्रयोग बंद करणार... ' अशी आगावू सूचना केली होतीच. [अर्थात संबंधितांनी नंतर दिलगिरी व्यक्त करून प्रयोग पुढे चालू ठेवण्याची विनंती त्याना केली.... जी त्यानी मानलीही.... ]