खुसखुशीत शैलीत लिहिलेला लेख आवडला.
दौत, टाक, शाई, शाईचा डाग ह्यांच्या उल्लेखाने मलाही माझे बालपण आठवले. शाळेतून संध्याकाळी घरी आल्यावर शाईची बोटे दगडावर घासून स्वच्छ करावी लागत. दौत हातात नीट धरता यावी म्हणून तिला दोऱ्याचा एक बंद बांधला जाई. तो बंद तयार करणे जरा कौशल्याचे काम असे आणि टाकाला 'नीफ' (nib नव्हे! ) लावावे लागत असे. त्यातही एक 'मराठी नीफ' नावाचे नीफ चांगले समजले जात असे. पुढे फौंटन पेने आली आणि दौत बरोबर नेणे बंद झाले पण शाईची बोटे तशीच राहिली कारण पेने बऱ्याचदा 'गळत' असत. त्यानंतर बॉलपेने आली पण शाळेत ती वापरू देत नसत कारण बॉलपेनाने अक्षर बिघडते असे तेव्हा सांगितले जात असे. असो. आता पेनाने लिहिण्याची वेळही फारशी येत नाही. मात्र हल्लीच काही कारणाने पानभर मजकूर पेनाने लिहिला तेव्हा 'अवाच्य' (अर्वाच्य नाही) अक्षर, खाडाखोड, शाईचे डाग नसले तरी ठिपके ही माझ्या शाळकरी लेखनाची वैशिष्ट्ये फारा दिवसांनी बघायला मिळाली.