मना तुझे मनोगत मला कधी कळेल का..
कृपया येथे ऐकावे

सुधीर मोघेंनी लिहिलेलं, संगीत दिग्दर्शक आनंद मोडक यांनी बांधलेलं आणि आशाताईंनी गायलेलं एक अतिशय शांत आणि तितकंच सुरेख गाणं..

कमालीची मनस्वी चाल आहे या गाण्याची. ‌गाण्यातल्या अर्थाप्रमाणेच, स्वत:च्या मनाशी सहज संवाद साधणारी अतिशय सुंदर चाल बांधली आहे आनंदरावांनी..

एखाद्याला सुहृदाला विश्वासात घेऊन, अगदी सहज त्याच्या खांद्यावर हात ठेवून काही विचारावं असं विचारलं आहे मनाला.. क्या बात है..!

एखादं सुंदर, हवेशीर, प्रसन्न घर असावं.. अवचित एखादी वाऱ्याची मंद झुळुक यावी आणि त्यासोबत दाराखिडकीचा पडदा अगदी सहज थोडा उडावा.. तसं असावं मनाचं हे घर.. आणि त्याच्याशी गूज साधणारी या गाण्याची केवळ अप्रतिम अशी चाल.. जियो...!
मना तुझे मनोगत

कोण जाणे केवढा तू व्यापतोस आकाशाला
आकाशाचा अर्थ देसी एका मातीच्या कणाला
तुझे दार माझ्यासाठी थोडेतरी खुलेल का!

जियो मोघेसाहेब..!

तुझे दार माझ्यासाठी थोडेतरी खुलेल का..

हे भांडण नाही, हा वाद नाही, हा तंटा नाही.. हे केवळ एक विचारणं आहे..म्हटलं तर मागणं आहे.. मनाच्या सुहृदाकडे किंवा सुहृदाच्या मनाकडे..!

-- तात्या अभ्यंकर.