मनोगतावर पारिभाषिक शब्द शोधायची सुविधा पुष्कळ काळापासून कार्यान्वित आहे. ती प्रसिद्ध झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या कोशांचा अंतर्भाव तिच्यात करणे प्रकाशित /उपलब्ध होणाऱ्या कोशाच्या स्वरूपावर अवलंबून असल्याने, चित्रप्रतिमा स्वरूपात प्रकाशित होणारा कोश तिच्यात थेट अंतर्भूत करणे शक्य नव्हते.
देवनागरी प्रकाशीय अक्षरओळखीची प्रगती जालावर इतरत्र सुरू आहेच. ती पुरेशी सक्षम झाली की अशा कोशांचे देवनागरी मजकुरात रूपांतर करणे शक्य होईलच.
पण तोवर काय?
तोवर उपलब्ध असलेले कोश कशा प्रकारे उपयोगी स्वरूपात सादर करता येतील यावर प्रशासनाने विचार करून काही योजना आखलेली आहे. तिचा पहिला प्रयोग म्हणून हा कोश उपयोगी स्वरूपात सादर करण्यात येत आहे.
हा कोश भाषा संचालनालयाच्या सौजन्याने जालावर पूर्वीपासून उपलब्ध होताच. मात्र तेव्हा तो उतरवूनही प्रशासनाची ही योजना पुरेशी मूळ धरे पर्यंत तो सादर करता येत नव्हता.
आता हे काही प्रमाणात शक्य झालेले आहे.
हाच कोश का निवडला ह्याची काही कारणे
कोश तसा आकारमानाने बेताचा आहे, त्यामुळे प्रायोगिक पायऱ्यांमध्ये काही मूलभूत बदल झाले तर सगळ्या कोशात बदल करणे तुलनेने सोपे जाईल असे वाटले.
वृत्तपत्र ही रोजच्या वापरातली गोष्ट असल्याने इंग्रजी आणि मराठी शब्द चांगले परिचयाचे आहेत, त्यामुळे चुका शोधणे सहज शक्य होईल असे वाटले.
कोशात संगणकविज्ञानाशी/माहितीतंत्रज्ञानाशी संबंधित अनेक प्रतिशब्द दिसून आले.
शब्दशोधनाची सुविधा : इंग्रजी शब्द भरून त्यासाठी मराठी प्रतिशब्द शोधण्याची सुविधा देऊन ती तपासून पाहणे शक्य झालेले आहे. शब्द आणि प्रतिशब्द परिचयाचे असल्याने सुधारणेस दिसणारा वाव चटकन ध्यानात येईल असे वाटले.
हा कोश न्याहाळून, शब्द शोधून ह्या सुविधेतले गुणावगुण उघडकीला आणले गेलेतर सुधारणा करणे शक्य होईल असे वाटते.