१. झाडांची ठिकाणे अशी निवडा जेणेकरून त्यांना पाणी घालताना तुम्हाला, नलिकेला आणि पाण्याला त्रास होणार नाही.
(म्हणजे तुम्हाला सोईस्कर होईल. नलिका कुठेतरी अडकणार नाही,वाकणार किंवा मुडपणार नाही, जोड असेल तर तो जोड सुटणार नाही आणि पाण्याचा अपव्यय टळेल.)
किंवा सरळ असं कराः
जिथं जिथं झाडं असणार आहेत, तिथून एक नलिकापाईप सोडा. तिचे एक टोक नळाला जोडले असेल आणि दुसरे बंद असेल. मधला भाग हा
सर्व झाडांजवळून जाईल. ह्या मधल्या भागाला जागोजागी छिद्रं पाडा म्हणजे फक्त नळ चालू केला की काम झालं. फक्त ते व्यवस्थित झाडांपर्यंत
पोहोचतं की नाही ते पाहत रहा.
२. कुंड्या वगैरे ठेवणार असाल तर त्या उंचीवर ठेऊ नका. त्याही जमिनीवरच ठेवा.
३. बाग शक्यतो घराच्या एका बाजुसच येईल असे बघा. नाहीतर पाणी घालण्यासाठी तुम्हाला घराच्या चहूबाजूंनी फिरावे लागेल, नलिका घेऊन.
४. पाणी घालताना तुम्ही उभे असलेली जमिनीची पातळी आणि झाडे असलेल्या जमिनीची पातळी यात फरक असू द्या. झाडे शक्यतो खाली
असावीत. म्हणजे एकतर झाडाची वाळलेली पाने गोळा करत बसण्याऐवजी फक्त ती झाडांकडे सरकवून दिली की झालं. आणि हे "वाळवण"
कृपया जाळू मात्र नका. त्याचे कदाचित खतही होईल.
५. पातळीच्या ह्या फरकामुळे, जे काही पाणी इतर कारणामुळे तिथे सांडेल, तेही गुरुत्वाने, आपोआप झाडांकडेच जाईल.
६. घराबाहेर आणि आत अशी बाग करणार असाल, तर शक्य असलेस, दोहोंना स्वतंत्र नळाची (आणि पर्यायाने नलिकेची)व्यवस्था करता आली तर पहा.
७. शक्यतो एकसंघ नलिका असलेस उत्तम.
वरील सर्व गोष्टी मी माझ्या घरातील बाग संभाळताना मला ज्या अडचणी येताहेत त्याबरहुकूम सांगितलेल्या आहेत. सध्यातरी इतकेच.
कृष्णकुमार द. जोशी
कोल्हापूर.