प्रिय मनोगतींनो,
या कथेला भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार. खरं म्हणजे अनुवाद करणे हे कठिण काम. मूळ कथेची रंगत आणि आशय कुठेही बदलायचा नाही, मात्र भाषा आणि शैली मात्र बदलायची कारण शब्दशः भाषांतरात अनेक अनपेक्षित विनोद निर्माण होतात आणि कृत्रिमपणा येतो. ('मला भिती वाटते कि ते आहेत कामात.' I am afraid he is busy!!) पु.लं. आणि शांता शेळके यांना अनुवाद आणि मूळ लेखन या दोन्ही गोष्टी सुरेख जमतात. (पु. ल. यांचे 'काय वाट्टेल ते होईल' आणि शांता शेळके यांचे 'पश्चिमरंग' अवश्य वाचावे.)
ऑस्कर वाइल्ड्चे 'भूत' मूळ कथा वाचण्यात जी गंमत आहे ती भाषांतरात नसेल, पण माझ्या भाषांतराने निदान मूळ कथा वाचण्याची उत्सुकता वाचकांत निर्माण झाली असेल अशी आशा. मूळ कथेतील विशेष गोष्ट म्हणजे आंग्ल लोकांना 'अमेरिकन लोक जरा आगावूच असतात' अशी वाटणारी भावना कथेत नीट व्यक्त झाली आहे. (ती तशी व्यक्त झालेली शेरलॉक होम्सच्या १-२ कथांत आणि शार्पेच्या 'विल्ट' कथेतही जाणवते.)
'हॅरी पॉटर' मी वाचलेले नाही. कोणी हळूहळू हॅरी पॉटरचे अनुवाद मनोगतावर आणेल काय?