मुरलेल्या काजूफेणीसारखे हे लिखाण क्रमशः चढतच जाते आहे. 'नळी फोडून'चा संदर्भ थोडे सूक्ष्मात गेल्यावरच लागला. गर्ल फ्रेंड चे किस्सेसुद्धा स्मितजनक आहेत. बिअरला मोजून पाच वेळा नको म्हटले हे वाक्य चुकीचे वाचल्याची शंका येऊन पुन्हापुन्हा वाचले. पण ते 'नकोच' निघाले. असो. लिखाण सुंदर आहे.

 गोव्याला एकदा अक्ख्या कुटुंबकबिल्यासोबत खाजगी मिनीबस घेऊन गेलो होतो. सगळी मौजमजा (म्हणजेच भोंगळ कारभार ) असल्याने एकाने प्रवास ठरवला, दुसऱ्याने बस ठरवली, तिसऱ्याने ताब्यात घेतली असा सगळ्यांचा हातभार घेत घेत आम्ही तिन्हीसांजेला गोवासीमेवर पोचलो. तिथे कागद तपासणीच्यावेळी कळले की वाहनाचा नंबर आणि कागदावरचा नंबर यात आकड्यांची उलटापालट झाली आहे. म्हणजे उदा. ८५३१ च्याजागी कागदावर ८३५१ झाले होते. झाले. बसमध्ये पुष्कळ वैविध्य असल्याने उपाय आणि मार्गही तसेच विविध उद्भवू लागले. काही थोडेजण 'द्या पैसे आणि एकदाचे टाका मिटवून' म्हणत होते पण ते अल्पसंख्य होते. बहुतेक सर्व 'शुचिता'वाले होते. काही जण 'वाहतूक अधिकाऱ्यांचे मतपरिवर्तन अर्थात मनधरणी' वादी होते. ते आपापल्या परीने आळवणी करू लागले. काही लोकांना आपापल्या ओळखी (म्हणजे वशिला) वर भरवसा (म्हणजे माज) होता. ते तिथल्या हॉटेलातून फोनाफोनी करू लागले. अधिकाधिक रात्र होत होती आणि गोव्यात रस्त्यावरच काय पण फोनवरही माणसे भेटणे मुष्किल होते. इकडे बसमध्ये 'नक्की कुणाची चूक' यावर तुंबळ रणकंदन माजले. शेवटी आर टी.ओ.तल्या गैरहजर कारकुनावर खापर फुटून बँका, एलाय्सी, पोस्ट वगैरे सगळ्या नोकरशाहीचा उद्धार झाला. यातून ड्राय्वरही सुटला नाही. त्याने न बघता पेपर घेतले म्हणून दंड त्यानेच भरावा असे ठरले. पण दंडाची रक्कम त्या काळी जास्त म्हणजे आठशे रुपये झाली. तो मालकांना विचारतो म्हणू लागला. मुंबईला फोन लागेना. लागला तर मालकसुद्धा वीकेंड साठी बाहेर गेले होते. शेवटी बरीच भवती न भवती होऊन आम्हीच पैसे भरले आणि ते वसूल करण्याची जबाबदारी बस ठरवणाऱ्यावर टाकण्याचे एकदाचे ठरले. दंडच भरायचा होता तर आधीच का नाही भरून टाकला यावरही एक जंगी चर्चा झाली. यथावकाश सरत्या रात्री आम्ही गोव्यात प्रवेशते झालो. यात पोरांचा कालवा जमेस धरलेला नाही. पोरांनी कंटाळून बसमधून खाली उतरू नये यासाठी चाललेला पालकांचा आटापिटाही जमेस धरलेला नाही.