छान जमले आहे. त्रयस्थ दृष्टिकोन आवडला.
आयुष्यातल्या अडचणी नंतर विचार करता फार किरकोळ आणि विनोदीही वाटू लागतात. प्राचीन काळी म्हणजे एक्स्प्रेस मार्ग झाला नसतानाच्या काळी बदलीमुळे अक्खे बिऱ्हाड हलवायचा प्रसंग आला. घरातल्या थोरामोठ्यांनी 'गुरुवारी प्रस्थान ठेवलेले बरे' असे सुचवले.मुलांना मागे घरीच ठेवून, देव्हाऱ्यात नारळ ठेवून आणि बाहेर सामानाच्या ट्रक समोर नारळ फोडून आम्ही मागोमाग गाडीने निघालो. बोर घाटाच्या ऐन चढणीवर पाहतो तो ट्रक रस्त्याच्या कडेला उभा. नादुरुस्त झालेला. मेकॅनिक शोधायला मागेपुढे बरेच चालावे लागले. बऱ्याच वेळाने एक जण भेटला. त्याने थोडा वेळ काही खाटखूट केले आणि जमत नाही म्हणून मुंडी हलवली. आता दुसरे वाहन शोधणे आले. एव्हाना दुपार टळून गेली होती. शेवटी तिन्हीसांजेच्या थोडे आधी कसाबसा एक ट्रक निम्म्या अंतरासाठी दुप्पट भाड्याने मिळाला. अंधारात घाटातच सगळे सामान रस्त्यावर उतरवले आणि दुसऱ्या वाहनात चढवले. इथे बाकी दोन्ही वाहनांच्या ड्राय्वर-क्लीनरनी मदत केली. गंतव्यस्थानी रात्री दहा वाजता पोचलो. गुरुवार होता आणि तिथे लोड-शेडिंग होते. अंधारातच सामान उतरवले. भावी शेजाऱ्यांकडे मेणबत्त्या मागितल्या. त्यांचा तुटवडा असल्याने दोघातिघांकडून एकेक दोनदोन घ्याव्या लागल्या. दुसऱ्या मजल्यावर सामान कसेबसे चढवले. नशीबाने नळाला पाणी होते. जेमतेम हातपायतोंड धुतले आणि नळाचे पाणी पिऊन सतरंजीवर तसेच झोपून गेलो. अनायासे गुरुवारचा उपास घडला. नंतरच्या खानेसुमारीत फ्रिज, टी. वी. हे मोहरे गळा(ठ)ले होते. चिल्लरखुर्दा किती उडाला त्याची मोजदाद बरेच दिवस सुरू होती. ह्या सगळ्या गळतीत परदेशी बनावटीच्या छत्र्या गळाल्याचे दुःख मात्र कित्येक दिवस सलत होते हे लक्ख आठवते.