तुमचे बरोबर आहे. माझे म्हणणे इतकेच होते की हा नियम निरपवाद नाही. डॉ. माधव पटवर्धन (माधव जूलियन) आपल्या "पद्यप्रकाश" (१९३८) ह्या पुस्तकात ह्याविषयी लिहितातः

"चरणान्त्य लघु हा गुरु केव्हा होतो? चरणा‍न्तीं कांही मात्रांचा विराम असल्यास अन्त्याक्षरांतील स्वर लाम्बविण्यास वाव असल्यास चरणान्त्य लघु हा स्वाभाविक दीर्घोच्चाराने गुरु होतो. (ठळक अक्षरे मूळ लेखकाची - मि. फ.) वृत्तरचनेंत मौक्तिकदामसारखी कांही थोडीं दुर्मिळ वृत्तें वगळल्यास अन्त्य लघु हा बहुश:  गुरु होतो. अन्त्य अ असा गुरु झाला तर तो लिहून दाखविण्याची सोय लिपींत नाही. तेव्हा त्याच्यापुढे ऽ हें चिन्ह घालून एका मात्रेची वाढ दाखवून लिपींतील उणीव पद्यलेखनापुरती, निदान जातिलेखनापुरती तरी दूर केली पाहिजे; नाहीतर घोटाळा होण्याचा संभव असतो.
। रातराणिचा । परिमळ सुमधुर
। करीं मनींचा । विषाद दूरऽ
या दोन चरणांतील अन्त्य र' एकसारखे नाहीत. पहिल्या चरणांत र' लघुच आहे; पण दुसर्‍या चरणांतील र' द्विमात्रक गुरु आहे.

चरणान्त्य अकार हा कित्येकदा दिखाऊ म्हणजे अनुच्चारितच असतो. अशा ठिकाणी तें अक्षर पायमोडकें लिहिणेंच शुद्धलेखनाच्या नि पद्यपठनाच्या दृष्टीने इष्ट असतें. (ठळक अक्षरे मूळ लेखकाची - मि. फ.)
"पाखरा । येशिल का पर-।तून्‌      ध्रु.
। मत्प्रेमाने । दिल्या खुणांतुनि । एक तरी अठ-। वू‌न्‌  " १. (टिळकांची कविता)

मौक्तिकदाम  [   ̮ ।   ̱   ̮   ̮   ̱   ̮   ̮   ।    ̱   ̮   ̮   ̱   ̮   ]
किती बघ सिंधु भयड्‌.कर खोल
नि त्यांतच मौक्तिक तें बहुमोल;
मिळे परि पाणबुड्यास छदाम
नि घालि गळां नृप मौक्तिकदाम."