खरंतर हल्ली कसंही लिहितात आणि तेच बरोबर आहे असे म्हणतात.  एकदा  मुंबईतील माझगाव विभागात एक मनसेचे   मोठे होर्डिंग लावले होते. त्यावर राज ठाकरेंचा फोटो होता. आणि लिहिले होते , " आपणा सर्वांचे मःनपूर्वक (मनः पूर्वक नाही बरं का) अभिनंदन. " एवढ्या 
मोठ्या प्रमाणात झालेली चूक पाहून हसावं की रडावं कळेना.विसर्ग किंवा  अनुस्वार कुठे द्यायचा हे कळतच नाही. एका ठिकाणी "डांन्स क्लासेस " अशी  पाटी होती. त्यातील डान्स या शब्दातील अनुस्वाराने  केलेला डान्स वाचण्यासारखा होता. काही शब्द तर इतके मजेशीर लिहितात की तुम्हाला  नक्की कोणाची कींव करावी कळत नाही. रंगाऱ्याची की त्याला लिहून देणाऱ्याची ? काही वेळा तर शब्दच काय , वाक्यच्या वाक्य बदललेली दिसतात. आणि तीच बरोबर वाटतात. साधारण पणे कोणत्याही दूरदर्शनच्या सीरियलमध्ये " एखादी गोष्ट तू करू नकोस " असं न म्हणता 
"हे तू करणार नाहीस" चक्क " ये तुम नही करोगे " चे भाषांतर करतात. ते पण  मराठीत थेट आज्ञा देण्याची सोय असताना.लवकरच आपल्याला हिंदी मिश्रित आणि अशुद्ध मराठीचे वर्ग लावावे लागतील असे दिसते. आता तुम्ही म्हणाल त्याने काय बिघडले ? भावना पोचल्या म्हणजे झालं.