आपल्या प्रतिसाद-पृच्छेबद्दल धन्यवाद.

 आपल्या पृच्छेबद्दल थोडेसे : * त्याच्या सगुणत्व-स्वीकाराची ही त्याला सार्थकता वाटते. : सार्थकता या शब्दातून ’मनात काही इच्छा बाळगून केलेले सायास, घेतलेले कष्ट आणि अंतिमतः मनाला समाधान देणारी फलप्राप्ती’ या दोन्हींचा बोध होतो. या वाक्यातील ’वाटणे’ या क्रियापदाने मनाची अवस्था दाखविली जाते. भावना होणे, आवडणे, मनाने स्वीकार करणे असा अर्थ या क्रियापदाद्वारे दाखविला जातो. परमेश्वर हा मुळात निर्गुण-निराकार. ’एकोऽहम् बहुस्यामहः’ या श्रुतिप्रमाणे त्याच्या मनात प्रथम एक ऊर्मी उपजली... तीच माया. ही ऊर्मी उपजता क्षणी निर्गुण-निराकार असलेल्या परमेश्वराला पुरुष ही संज्ञा प्राप्त झाली. ते परमेश्वराचे नारायण अथवा महादेव रूप झाले. त्याच्या मनात उपजलेल्या ऊर्मीचे प्रेरणेत रूपांतर झाले. पुरुष कार्यप्रवण झाला. त्याच्या ठिकाणी सृजन-स्थिती-लय या कर्तृत्वाला जाग आली. विश्वाचे पाळण हा पुरुषाच्या ’स्थिती’ या कर्तृत्वाची व्यक्ती आहे, हे उघडच आहे. तुकोबारायांचे अन्यत्र एक वचन आहे - ’नटनाट्य तुम्ही केलें याचसाठीं । कवतुकें दृष्टी नीववावी ॥’ यात ’कौतुकाने दृष्टी निवणे’ ही स्थिती देव आणि भक्त दोघांचीही आहे, कारण ’गंगा-सागर संगमीं अवघ्या ऊर्मी एक’ होऊन जातात. आद्य शंकराचार्यांनी म्हटले आहे - ’पारमार्थिक यद् अद्वैतम् द्वैतम् भजनहेतवे । भक्त्यर्थम् स्वीकृतम् द्वैतम् अद्वैतात् अपि सुंदरम् ॥’ देव आणि भक्त या दोघांनीही केवळ भक्तीसाठी द्वैत स्वीकारलेले आहे. निर्गुण-सगुण असलेला तोच जीवांसवे क्रीडा करीत असतो. येथे ’बिम्ब-प्रतिबिम्ब’ न्यायाने उभयतांना समाधान लाभत असते.
 भक्ताचे देवाशी झालेले तादात्म्य पाहून ’रामाला’ भरते येते; रामाच्या सान्निध्यात आत्मारामाला भरते येते. भक्ताची सुख्-दुःखे देवाचीच होऊन जातात. मग तो जनाबाईंसाठी जाते ओढू लागतो, तिला आंघोळही घालतो. नामदेवाचा हट्ट पुरविण्यासाठी हसतऱ्हसत वाटीभर दूध पितो. तुकोबारायांसारख्या परखड भक्ताच्या शिव्याही हसत हसत स्वीकारतो.
 भक्तीतला देवाचा व्यवहार आपण जरी बाजूला ठेवला, तरी जीव जेव्हा इच्छिलेले पावतो, तेव्हा त्याच्या आनंदी होण्याप्रमाणेच त्याच्या आत्मारामाचे आनंदी होणे स्वाभाविक असते, कारण मुळात जीव आणि शिव यांचे अद्वैत आहेच.
 म्हणूनच विश्वाची उभारणी केलेल्या नारायणाला जीव आनंदी झालेला पाहून, त्याचे कल्याण झालेले पाहून कृतकृत्य वाटणे, केल्या कार्याबद्दल सार्थकता वाटणे, स्वाभाविक आहे.