तात्याराव (दुसरे विनायकराव) अंदमानातून सुटल्यावर हिंदुत्त्ववादी झाले आणि
त्यानंतर भाषाशुद्धीचे पुरस्कर्ते (या दोन गोष्टींचा क्रम कदाचित उलटाही
असेल पण दोन्ही गोष्टी ते अंदमानातून सुटल्यानंतरच्या आहेत हे नक्की).
येथे अमेरिकेत अनेकजण (विशेष करून कृष्णवर्णीय) तुरुंगात जाऊन मुसलमान होत असल्याबाबत ऐकलेले आहे. तेथे हे तुरुंगात जाऊन हिंदुत्ववादी बनले. यास सामांतर्य म्हणावे, किंवा कसे, ते कळत नाही, परंतु हे जे काही आहे, ते रोचक आहे, हे मात्र नक्की.
(दुसऱ्या) विनायकरावांच्या या परिवर्तनास (म्हणजे हिंदुत्ववादाचा तथा भाषाशुद्धीचाही पुरस्कार) नेमके काय कारणीभूत ठरले असावे बरे? (कृष्णवर्णीयांच्या परिवर्तनासही नेमके काय कारणीभूत ठरत असावे, याबाबतही कुतूहल आहेच. म्हणजे, मनुष्य केवळ तुरुंगात वेळ घालविण्याचे साधन म्हणून एखादा धर्म किंवा एखादा वाद अंगीकारत असावा, असे वाटत नाही. किंवा, कोण जाणे, कदाचित असेलही. मी कधी तुरुंगात गेलेलो नाही, किंवा तुरुंगात गेलेल्या अथवा जाऊन आलेल्या कोणाशी माझी वैयक्तिक ओळखही नाही, त्यामुळे खात्रीलायक माहिती नाही. तर सांगायचा मुद्दा, कृष्णवर्णीयांच्या इस्लाम अंगीकारण्यामागील प्रेरणेबाबतही मला यत्किंचितही कल्पना नाही. परंतु त्याबद्दलची चर्चा येथे कदाचित अतिच अवांतर ठरेल, या भीतीस्तव आवरते घेतो. ) हा एक भाग झाला. दुसरे म्हणजे, विनायकरावांच्या परिवर्तनामागे जे काही कारण असेल ते असो, तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा झाला; परंतु ते कारण स्वतः भोगलेले नसताना, फार कशाला, अंदमानाच्याच काय, परंतु साध्या येरवड्याच्याही तुरुंगाचे स्वतः वायुभक्षण केलेले नसताना (फारसी/अरबी(? )प्रभावित मराठीत: हवा खाल्लेली नसताना), त्यांच्या असंख्य अनुयायांस (विशेष करून भाषाशुद्धीच्या संदर्भात) हे व्रत इतक्या अंधतेने पाळावेसे वाटण्यामागील प्रेरणा नेमकी काय असावी, याबाबतही कुतूहल वाटते.
त्यावेळी मनात आलेला पहिला प्रश्न होता "फुलबाग मला हाय पारखा झाला"
मधल्या "बाग" चे काय? भाषाशुद्धीचे पुरस्कर्ते व्हायच्या आधीची (अंदमानातही
जायच्या आधीची) ती कविता असल्याने ते माफ समजायचे का? याबद्दल त्यांच्या हयातीत त्यांना कोणी प्रश्न विचारल्याचे आठवत नाही.
कारण सोपे आहे. कारण हे शक्य नाही म्हणून.
प्रश्न विचारायचाच असता, तर "हे क्षम्य समजायचे का," असा प्रश्न याविषयी त्यांच्या आयुष्यात कदाचित विचारता आला असताही. परंतु "हे माफ समजायचे का" असा प्रश्न याबद्दल त्यांच्या हयातीत? कदापि शक्य नाही.