कुशाग्रजी, धन्यवाद.  आपण उद्धृत केलेल्या अभंगातील पहिला चरणखंड 'विठ्ठल सोयरा सज्जन विसावा ।' असा आहे. त्याचप्रमाणे या अभंगाचा चौथा चरण 'संत महंत सिद्ध महानुभाव मुनि । जीवभाव जाऊनि सांगेन त्या ॥४॥ असा असून 'माझिया माहेरी सुखा... ' हा शेवटचा म्हणजे पाचवा चरण आहे. 
     उपलब्ध असलेल्या सर्वच गाथ्यांतून अभंगांचे वर्गीकरण केलेले नाही. किंबहुना, काही जाणकारांनी अभ्यासाच्या सोयीसाठी तुकोबारायांच्या अभंगांचे वर्गीकरण केलेले दिसते. हे लेखन करताना आम्ही रा̱. गो. पाटील यांनी संपादित केलेला गाथा वापरीत आहोत. नाटाचे अभंग हे काहीसे दीर्घ असून त्यांची रचना चौपदरी चरणांनी केलेली आहे. विठ्ठल सोयरा... हा अभंग तसा नाही. त्याची रचना दोन पदरी चरणांची आहे. सदरचा अभंग 'स्थितीपर' प्रकरणातील आहे. या प्रकरणात दोन प्रकारचे अभंग घेतलेले असून त्यात देवाशी उद्गार हा एक प्रकार आहे व जनांशी उद्गार हा दुसरा प्रकार आहे. आपण उद्धृत केलेल्या अभंगातील पहिले दोन चरण तुकोबारायांचा मनोदय प्रकट करणारे असून त्यासाठी तुकोबारायांचा जो बंधुवर्ग आहे (संत महंत सिद्ध महानुभाव मुनि) त्याच्या सहाय्याची, मार्गदर्शनाची अपेक्षा  आहे. म्हणून हा अभंग 'स्थितिपर-जनांशी उद्गार' या प्रकारात गणला गेला आहे.