लेख खूप खूप आवडला. त्यातून आठवणी चाळविल्या गेल्या. ६५-६६ साली मी आणि माझे तीन मित्र पुण्याहून भोरमार्गे वरांधा घाट उतरून पाचाड गाठले होते. पहिला मुक्काम भोरला जोशी म्हणून मित्राच्या ओळखीतले एक होते, त्यांच्याकडे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी लौकरच पुढे कूच केले खरे, पण भोर सोडून तीन-चार मैल गेलो असू, आणि माझी सायकल पंक्चर झाली. आता काय करायचे, म्हणत रस्त्याच्या बाजूला बसलो होतो. काही वेळा नंतर एक दूधवाला भोरच्या दिशेने जात होता. तो आम्हाला पाहून थांबला. त्याला अडचण सांगितली, तेव्हा तो हंसला. 'पाणी नाही म्हणून काय झालं... दे पाना' म्हणत त्याने टायर उचकटला. ट्यूबमध्ये हवा भरायला सांगितली. तोपर्यंत त्याने चाकाजवळची माती हाताने साफ केली होती. त्या मातीवर ट्यूब फिरवून त्याने दाखविले. जिथे पंक्चर होते तेथून हवेचा झोत येत होता, त्याने माती उडविली. 'घे, लाव पॅच... ' आम्हाला एक नवा धडा देवून तो देवदूत निघून गेला.
वरांध्याच्या घाटातून खाली पाहिले, तेव्हा डोळ्याचे पारणे फिटले... अनेक काड्यापेट्या चिकटून चिकटून शेजारी शेजारी ठेवाव्यात तशी रिकामी शेते खाली दिसत होती. वरांधा घाट इतका चिंचोळा होता की वळणावर एस. टी. ला तीन चार वेळा तरी पुढे मागे करून वळण घ्यावे लागत होते. तो घाट चालतच चढावा लागला होता नि उतरावा लागला होता.
पाचाडला एस. टी. स्टँड म्हणून जी जागा होती तिथे एक शेडवजा हॉटेल होते. तिथे बटाटावडा घेतला. त्यावर चटणी म्हणून चक्क तांबड्या तिखटाची पूड पेरली होती. हाऱ्हू करीत तो वडा खाल्ला. त्यावर गरम चहा पिताना ब्रम्हांड आठवले होते.
सायकली हातात घेऊनच गड चढला. त्या दिवशी संकष्टी होती, हे नंतर लक्षात आले. दिवस मावळताना गेस्ट हाऊस नावाच्या सांगाड्याला सांभाळणारा कर्मचारी आला. पन्नाशीच्या त्या गृहस्थाला आमचे कौतुक वाटले. त्याने घरी जाऊन आमच्यासाठी पिठले भाकरी करून आणली. पैसे न घेता त्याने आमचा पाहुणचार केला होता, हे विषेश.
परतताना आलेला अनुभव नेमका उलटा होता. रात्र झाल्यानंतर एका गावात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंताचा एक बंगला दिसला. तिथे जाऊन फाटक वाजविले. आम्ही भिकारी असल्याप्रमाणे आमच्याकडे पाहून त्या महाशयांनी त्वरेने परत घरात जाऊन धाडकन दरवाजा लावून घेतला. नंतर एका टपरी टाईप हॉटेलची मालकीण हॉटेल बंद करण्याच्या तयारीत होती. त्या बाईंना चहा वगैरे काही मिळेल का विचारले. त्या बाईंनी मुद्दाम दूध मागवून आम्हाला चहा करून दिला. त्यांच्याकडे गावातल्या मारुतीच्या देवळाविषयी चौकशी केली. त्या बाईंनी आमची अडचण जाणली असावी. त्यांनी हॉटेलच्या आवारात आमच्यासाठी अंथरुण टाकून देण्यास नोकरास सांगितले. सकाली चहा-नाश्ता देऊन त्या बाईंनी आम्हाला निरोप दिला.
परतीच्या प्रवासात कात्रज घाट चढून येईतो रात्रीचे आठ वाजायला आले होते. तिथून पुण्याचे जे दृष्य दिसले, ते अविस्मरणीय होते. वरती काळी-निळी छटा घेऊन चमकू लागलेले आकाश आणि खाली दूरवर निळे पिवळे असंख्य दिवे चमचमते...!!!
काही महिन्यांनी पानशेत मार्गे चालत तोरणा पाहिला. पुढे पुणे सोडावे लागले, ते आजतागायत. आता तो उत्साह नाही. आमची गडयात्रा तेथेच संपली.