मी आणि काळे यांनी जरी बापूला साथ करण्यासाठी नकार दिला नसला तरी आमच्याविषयी त्याला खात्री नसावी त्यामुळे त्याने कोणाकोणाकडे चौकशी करून साथीदारही मिळवले होते.त्यापैकी तबल्याचे साथीदार आमच्या संगीतमंडळातच कधी कधी येणारे लिमये होते.ते प्रथम संगीतमंडळात आले त्यावेळी बापूने त्याना खूष होऊन त्यांच्या तबलावादनाचा गौरव करून त्यांना छोटीशी भेटही दिली होती अर्थातच या त्याच्या औदार्याला स्मरून त्यानी त्या कार्यक्रमासाठी त्याला साथ करणे स्वाभाविक होते.पण हार्मोनियमलाही एक वृद्ध गृहस्थ भागवत त्याने पैदा केले . त्यानी तर त्याला सरावासाठी दोनदा आपल्या घरी बोलावून त्याला उपयुक्त सूचनाही केल्या असे त्याने मला फोनवर सांगितले.
     कार्यक्रमाच्या दिवशी मी जरा उशीराच पोचलो पण आश्चर्य म्हणजे आमच्यासारखेच बरेच श्रोते अगोदरच उपस्थित होते हे पाहून मला आश्चर्य व आनंदही वाटला.सभागृहात मी शिरताच मला बापूने पकडलेच व मंचावरच माझी स्थापना केली व मला निवेदन करण्यास लावले.त्याने कोणती गाणी म्हणायचे ठरवले होते याविषयी मला कल्पना नसल्यामुळे त्याने आपण म्हणत असलेल्या गाण्यांची यादी माझ्या हातात दिली.तबलाव पेटी साथीदार अगोदरच उपस्थित होतेच.ध्वनिवर्धकाचीही व्यवस्था होती.माझी ओळख त्यानेच करून द्यावयास सुरवात केली व त्यात स्वत:विषयी व म्हणणार असलेल्या गाण्याविषयी त्यानेच सांगितल्यामुळे माझे निवेदनाचे काम बरेच सुकर झाले.आपण म्हणत असलेल्या गाण्याचा श्रोत्यांवर काय परिणाम होतो याविषयी फारशी काळजी नसल्यामुळे व स्वरतालाचे फारसे बंधन न मानण्याच्या वृत्तीमुळे तो अगदी बेधडक म्हणत होता.श्रोत्यात बहुतांश त्याचे माझ्यासारखेच मित्र असल्यामुळे प्रत्येक गाण्यास टाळ्या वाजत होत्या आणि त्यामुळे बापू खुषीत होता.
     " श्रोत्यांविषयी ज्ञानदेवांनी तुम्हीच माझ्या तोंडून हे वदवीत आहात असे जे म्हटले आहे त्याचा उल्लेख करून येथे जमलेले श्रोते हेच खरे तर बापूच्या तोंडून गाणे म्हणवीत आहेत कारण त्याचे  गाणे ऐकण्यापेक्षा त्याच्या स्नेहरज्जूत बांधले गेल्यामुळेच ते आले आहेत"  असा मी उल्लेख केल्यावर टाळ्यांचा मोठा गजर करून श्रोत्यांनी सहमति दर्शवली. त्यामध्ये श्रोता होण्याबद्दल बिदागीची अपेक्षा करणारा वात्रट मित्रही होता.तो तर बऱ्याच दूर अंतरावरून  आलेला होता. 
    बापूचा कार्यक्रम झाल्यावर आमच्या खाजगी बोलण्यात बापूनेही कबूल केले "असा कार्यक्रम करण्याचे धाडस केले खरे पण ते अंगाशी येते की काय असे वाटत होते."एक मात्र निश्चित त्याच्या गाण्याविषयी आमचे काहीही मत असो त्याने त्यादिवशी मैफिल जिंकली हे मात्र मला मान्यच करावे लागले.