आपण हे लेख वाचीत असालच याबद्दल मला विश्वास होता. आपला प्रतिसाद न आल्याचे पाहून मला आतापर्यंतचे या विषयावरील लिखाण स्वीकारार्ह आहे, असे वाटते. धन्यवाद.
आपण उभे केलेले दोन्ही प्रश्न स्वाभाविक आहेत. यम, यमयातना, यमलोक या विषयांच्या अनुरोधाने माझे विचार ‘यमयातना कदाचित् अविश्वसनीय वाटतीलही...’ या ओळीतून उल्लेखिले आहेत. तो एक सामान्य अनुभव आहेही. भोळ्या-भाबड्या जनांना दुराचारापासून दूर ठेवण्यासाठीचा एक उपाय (सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट) म्हणून गेली हजारो वर्षे पिढ्यानुपिढ्या या कल्पना स्वीकारल्या गेल्या आहेत. त्यातून हानी काहीच होत नाही. सत्याचा शोध घेण्यासाठी अत्यंत प्रगल्भ बुद्धी ज्यांना लाभली आहे, अशांची संख्या नगण्य असते. आपण त्यापैकी एक आहात, म्हणून आपल्याबद्दल मला आदर आहे.
सृष्टीरचना आणि निसर्ग दोन्ही एकच. ते एक मह्त्कार्य आहे. त्यासाठी कुणीही कर्ता नाहीच, असे म्हणता येत नाही. आदिम कर्ता म्हणून ‘नारायण’ स्वीकारला गेला आहे. नार म्हणजे पाणी आणि नार हे ज्याचे अयन (निवासस्थान) तो नारायण. जीव सृष्टीचा आरंभ पाण्यातून झालेला आहे, हे विज्ञानाने मान्य केले आहे. कर्ता हा शक्तीयुक्त असतो, म्हणून तो सगुण. याला आपापल्या समजुतीनुसार काहीही नाव दिले तरी तो भगवंत असे मानले जाते आणि तसे संबोधिले जाते.
अमीबासारख्या प्राथमिक जीवात मैथुनक्रिया नाही. देहापासून देह, जीवापासून जीव हीच प्रक्रिया त्या योनीत आजही सुरू आहे. जीवाचा देह आणि त्याचे अंतःकरण जसजसे प्रगत होत जाते, तसतसे जीवाच्या उत्पत्तीसाठीच्या प्रक्रियाही प्रगत होत जातात. मत्स्य, कच्छ, वराहादी अवतारांच्या कथा जीवाच्या प्रगतीचा आलेख म्हणून घेता येतात. मैथुन ही क्रिया मानवी निर्मिती नाही, हे आपले म्हणणे खरेच आहे. त्याबद्दल दुमत नाही. तथापि, निसर्गाच्या मर्यादा न जाणता मनुष्य जेव्हा अतिचार करू लागतो, तेव्हा त्यांच्या परिणामाने निसर्गाने निर्माण केलेल्या देहाचे नुकसान होते. निसर्गाने घालून दिलेल्या मर्यादा, निदान मैथुनाबाबत, न पाळल्याने काय हानी होते, ते आता जगजाहीर झालेले आहे. नरदेहाचे होणारे एकूणच नुकसान टाळण्यासाठी कुणीतरी शास्ता असावा, भले तो काल्पनिक का होईना, असा विचार पुढे ठेवणे म्हणूनच गैर वाटत नाही. हा शास्ता आदिम नारायणाने नेमलेला प्रतिनिधी आहे, असा पारंपारिक विचार आहे. अतिचार करणा‍र्‍याला शासन देण्यासाठी तो नेमलेला आहे. तो करुणारहित, परखड आहे. यम-नियम हे माणसांसाठी, जे प्रमादप्रवण आहेत, त्यांच्यासाठी आवश्यक आहेत. भगवंताच्या अतिचारासाठी, जर त्याने तो केला असेलच तर, तोही यमाकडून दंडित होईलच, कारण धर्मरक्षण हा भगवंताचा गुण सांगितला गेला आहे. 
‘शरीरावर जितके रोम असतील, तितके....’ या संदर्भात मी मला असे समजाविलेले आहे की, मृत्युनंतर प्रामुख्याने देह दफन केला जातो किंवा दहन केला जातो. दफन केला असता म्हणजे तो देह जमिनीत खोल गाडला जातो, तेव्हा जीव हा मातीतच कोंडला जातो. त्याला वरील मातीचा थर दूर झाल्याशिवाय मुक्तता लाभणार नाही अथवा एखाद्या मोठ्या वृक्षाच्या मुळ्या त्या दफन केलेल्या देहावशेषापर्यंत पोहोचतील तेव्हा एखाद्या मुळीच्या शेंड्यावाटे तो वनस्पतीत प्रवेश करू शकेल. या प्रक्रियेस दीर्घ काळ लागणारा आहे. तोपर्यंत त्या जीवास कोंडमारा सहन करावा लागणार आहे. देहाचे दहन केले असता जीवास ऊर्ध्वगमन सहजशक्य होत असावे.
शेवटी भगवंताला साकार अवस्थेत कुठे बाहेर शोधणे व तो सापडणे, हे भोळ्याभाबड्यांना भक्तीयोगातून मिळालेल्या मानसिक शक्तीमुळे साधले आहे. केवळ ज्ञानाच्या कसोटीवर स्वतःचे अस्तित्व परमात्मस्वरूप अवस्थेत नेणे, ही अवघड प्रक्रिया ज्यांना साधली, त्यांना निर्गुणाची प्राप्ती झाली. परंतु आपल्या ज्ञानबलाचा ज्यांना आधार मिळाला, तेही शेवटी सारे सात्त्विक श्रद्धेने, त्यांचे श्रद्धास्थान वेगळे असते इतकेच, केलेल्या सायासांनी, भक्तियोगानेच, परमोच्च अवस्थेत पोहोचतात. ‘मी ते ब्रह्म आहे’ ही उपनिषदांची शिकवण आहे. ब्रह्म ही एक वस्तू असल्याचे श्रीज्ञानेश्वरांचे कथन आहे. हे ब्रह्म (आपल्या शब्दात अस्तित्व) हे सगुण वा निर्गुण रूपात गवसणे, म्हणजेच भगवंताचे दर्शन होणे, ही ज्याची त्याची वैयक्तिक पातळीवरील अनुभूती आहे. एखाद्या चित्रपटात आपण पाहातो, तशी ती सर्वांसाठी दृष्य असू शकत नाही. असो.