कुशाग्र
लेख आवडला. त्यानिमित्ताने माझ्या नूमवितल्या दिवसांच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यातल्या काही रोचक इथे देतो.
१९६९ च्या एप्रिलात मध्ये वडिलांची बदली अकोल्याहून पुण्याला झाल्याने आम्ही पुण्यात आलो. मी अकोल्यातून चौथीची वार्षिक परीक्षा देऊन आलो होतो. निकाल पोस्टाने पाठवू असे शाळेने कळवले असल्याने रोज निकालाच्या पत्राची वाट पहायचो. दरम्यान माझ्या ५ वी च्या ऍडमिशनचे प्रयत्न चालू होतेच. पण ऐनवेळी आल्याने नूमवी, भावे हायस्कूल सोडाच अगदी सरस्वती मंदिर आणि गोपाळ हायस्कूलातही प्रवेश मिळत नव्हता. अश्या निराशामय वातावरणात एक दिवस अचानक वडील म्हणाले "आपल्या विनूला नूमवीत ऍडमिशन मिळेल". वडिलांचे वरिष्ठ श्री. धर्माधिकारी यांची शि. प्र. मंडळींच्या (बहुधा) अध्यक्षांशी ओळख होती त्यामुळे हे शक्य होते.
पुढे एक दिवस शाळेत "ऍप्टिट्यूट टेस्ट" सदृश परीक्षा झाली. मुलाला कुठल्या तुकडीत घालायचे यासाठी ती होती. त्यानंतर शाळेचा पहिला दिवस आला. ५ वीच्या सर्व मुलांना सभागृहात बोलावले. पुढे एक शिक्षक आले, ५० मुलांची नावे वाचली. नाव वाचल्यावर प्रत्येकाने उभे रहायचे आणि सर्व नावे झाल्यावर शिक्षकाच्या मागोमाग आपल्या तुकडीत जायचे. ए, बी, सी, या क्रमाने एच. तुकडीतलीही मुले गेली. सभागृहात फक्त पर्यवेक्षक आणि मी.
"काय रे तुझे नाव आलेच नाही का? "
"नाही"
"असे शक्य नाही. तूच नीट ऐकली नसशील, चल माझ्याबरोबर. " हे झाल्यावर आम्ही पहिल्याने ५ वी ए च्या वर्गात गेलो, शिक्षकांनी विद्यार्थ्यांची यादी दाखवली. त्यात नाव नव्हते. पुढे बी तुकडीपासून वर्गशिक्षकच वर्गाबाहेर यायचे आणि विद्यार्थ्यांची यादी धडाधड मोठ्याने वाचून दाखवायचे. अश्या रीतीने एच तुकडीतही नाव नव्हते. पुढे मला त्यांच्या ऑफिसमध्ये बसवून ते मुख्याध्यापकांना भेटायला गेले. थोड्या वेळाने बाहेर येऊन मला ५ वी एच या वर्गात घेऊन गेले आणि तिथल्या शिक्षकांना मला या वर्गात प्रवेश दिल्याचे सांगितले. नूमवीत सर्वात हुशार विद्यार्थी ए तुकडीत, त्याहून कमी हुशार बी मध्ये तर अगदीच ढ विद्यार्थी एच मध्ये असे होते. त्यामुळे माझा हिरमोड झाला होता. अकोल्यातून आलो म्हणून काय झाले, तिथल्या शाळेत कायम ८०% गुण असायचे, पहिल्या दोघा - तिघांत नंबर असायचा.
नूमवीत ५ वी पासून इंग्रजी होते. अकोल्याच्या शाळेत इंग्रजी माध्यमातून शिकलो असल्याने इतर मुले एबीसीडी शिकत त्यावेळी मी वाक्ये लिहू शकायचो. परिणामी तिमाहीत १०० पैकी ९८ गुण मिळवून आठही तुकड्यांमध्ये पहिला आल्याने खळबळ माजली. आमचे इंग्रजीचे पोरे सर मात्र म्हणायचे "तुला कमीतकमी बी तरी तुकडी मिळायला हवी होती, पुढच्या वर्षी ही चूक दुरुस्त होईल".
५ वी एच मध्ये पहिला नंबर आला. ६ वीला ई तुकडी मिळाली, तिथेही पहिला नंबर आल्याने सातवीला मात्र ए तुकडी मिळाली. तिथे मात्र एक एक नमुनेदार अनुभव आले. वर्गशिक्षक श्री. परचुरे यांनी पहिल्या दिवशी मुलांना स्वतःची ओळख करून द्यायला सांगितली. त्यात ६ वीत कुठल्या तुकडीत होतो हेही सांगायचे होते. बहुतेक मुले ६ वी ए मधून आली होती, तर काही ६ वी बी मधून. ६ वी ई मधून आलेला मी एकटाच. मी ६ ई म्हटल्यावर सर्व वर्ग माझ्याकडे विचित्र नजरेने बघतो आहे असा भास झाला. पुढे एक दिवस श्री. परचुरे "थांब, या गोरेची तुकडीच बदलून टाकतो" असे पुटपुटले आणि पहिल्या बाकावर बसणाऱ्या अभ्यंकरने तातडीने ते माझ्यापर्यंत पोचवले. माझी बसण्याची जागा बदलून एका कोपऱ्यात दिली. शेजारच्या एक दोन बाकांवर बसणारी २-४ मुले सोडली तर सर्व वर्गाने माझ्याशी अबोला धरला होता.
त्यामुळे शाळेत अगदी अकरावीपर्यंत राहूनही मोजकेच ४-५ मित्र राहिले. पुढे फर्गसन कॉलेज किंवा आय आय टी बद्दल जितकी आपुलकी मनात उत्पन्न झाली तितकी नूमवी शाळेबद्दल झाली नाही हे खरे.
विनायक