आपला पहिलाच लेख आहे का? तसे असल्यास प्रयत्न ठीक आहे.
पण लेख फारच भाबडा आहे.
आमच्यावेळी कित्ती छान होतं आणि आता कसं सगळं अगदी वाईट्ट होऊन बसलंय असं गाणं गायची एक सवय प्रत्येक पिढीला असते. त्यानुसार दर दहाबारा वर्षांनी नवनव्या गाऱ्हाण्यांचा जन्म होत असतो.
तुम्ही शुभंकरोती म्हणत होता त्यामुळे कोणते पवित्र संस्कार तुमच्यावर झाले? केरकचरा बाहेर टाकू नये, .वन वे असताना विरुद्ध बाजूने गाडी दामटू नये, भर गर्दीच्या रस्त्यावर मध्येच कोंडाळे करून गप्पा हाणीत उभे राहू नये, गरज नसताना हॉर्न वाजवू नये,चुकीच्या बाजूने ओवरटेक करू नये, कानाला मोबाइल अथवा इयर्फोन लावून चालू नये हे संस्कार तुमच्यावर झाले का? आत्ताच्या परिस्थितीला उपयुक्त अशी शिस्त पाळण्याचे संस्कार वीस वर्षांपूर्वी तुमच्यावर होऊ शकले असते का? 'शत्रुबुद्धिविनाशाय' ह्या ओळीचा अर्थ तेव्हा तुम्हाला समजत होता का? आरोग्य, धनसंपदा, कल्याण आणि 'शत्रुबुद्धिविनाश' हे सर्व दीपज्योतीला नमस्कार करून साधले जाऊ शकते का?
आपल्या देशात खाण्यापिण्याची स्थिती दर पिढीमागे सुधारत आहे.(आपण मध्यम वर्गाबाबतच बोलत आहात असे गृहीत धरून- ) सध्या मध्यम वर्गातल्या पिटुकल्यांची पौष्टिक खाण्याबाबत चंगळ असते. चीज, पनीर, शुद्ध आयात खजूर, चांगली फळे, बदाम, पिस्ते, मनुका, या वस्तू त्यांच्या खाण्यात असतात. पास्ता किंवा मॅगी असली तरी त्यात भाज्या, चीज हे असतेच. पराठ्यात भाज्या घालून त्या खुबीने खिलवल्या जातात. मुलांना लहान वयातच पोहोणे, व्यायाम, व्यक्तिमत्वविकासशिबिरे यांची ओळख होते. इलेक्ट्रॉनिक खेळणी आणि वस्तू यंच्याशीही परिचय होतो. तीन वर्षांची मुले टॅब्लेट कंप्यूटर चालवू शकतात. मोबाइल चालू किंवा बंद करू शकतात. चार चाकीच्या पुढल्या भागात बाबांच्या शेजारी आणि आईच्या मांडीवर बसून स्टीअरिंग, ब्रेक, ऍक्सिलरेटर यांचे कार्य कुतूहलाने न्याहाळत असतात, त्या संबंधी प्रश्न विचारीत असतात. नर्सरीमध्ये जाण्यासाठी पालकांनी त्यांची पुरेपूर तयारी करून घेतलेली असते. जगभरातली निरनिराळी फळे, फुले, प्राणी, पक्षी यांची नावे आणि स्वरूप त्यांना चांगलेच ओळखीचे असते.
बालपण जगणे याचा अर्थ तुम्ही जगलेले अथवा तुम्हाला ठाऊक असलेले बालपण जगणे असा होतो का? तसे बालपण आजच्या मुलांना आवडेल का? सुट्टीत चार दिवस 'मामाच्या गावा'त रमणे वेगळे आणि सतत त्याच वातावरणात राहावेसे वाटणे वेगळे.
असो. बरेच लिहिता येईल. पण पहिलाच लेख असेल तर सध्या इतके पुरे.
नाउमेद होऊ नका, लिहीत रहा, तुमची तुम्हांलाच लेखनात आणि विचारांतत सुधारणा जाणवेल. शुभेच्छा.