बहिणाबाईंच्या काव्यप्रतिभेविषयी लिहीण्याचा इरादा नाही. ती निर्विवाद आहे.

त्यांच्या या कवितेनं मराठी माणसाला कैक वर्ष भुरळ घातली आहे, म्हणून मनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन नक्की कसा असावा ते उलगडण्याचा प्रयत्न करतो:


>मन वढाय वढाय
उभया पिकाताल ढोर
किती हाकल हाकलं
फ़िरि येत पिकावर

= मनाची प्रक्रिया अनैच्छिक आहे ही माणसाची युगानुयुगं अत्यंत चुकीची मूलभूत धारणा आहे. निव्वळ या धारणेमुळे मनाचा आवाका बेफाम वाटतो. वस्तुस्थिती तशी नाही. मी पहिल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ‘माइंड इज जस्ट अ‍ॅन अ‍ॅक्टिविटी बिटवीन टू इअर्स’


मन पाखर पाखर
तयाची काय सांगू मात
आता वहत भुइवर
गेल गेल आभायात

= मन कुठेही जात नाही ते फक्त विचार निर्माण करतं. त्या विचारांबरोबर वाहात गेल्यानं आपण आभाळात आणि भुईवर गेल्यासारखे वाटतो. आपण बसल्या जागीच असतो!

मन लहरी लहरी
त्य़ाले हाती धरे कोन
उंडारल उंडारल
जस वारा वाहादन

= मन वार्‍यासारखं वाहात नाही, विचारांचा अवेग जोरकस असू शकतो. अर्थात ज्या क्षणी आपल्या स्थिरत्त्वाचं भान येतं त्या क्षणी मन निष्प्रभ होतं.

मन जहरी जहरी
याच नयार रे तनतर
आरे इचू साप बरा
त्य़ाले उतारे मनतर

= हा दुसरा अत्यंत गंभीर गैरसमज आहे. मन न्यूट्रल आहे. इट इज अ फॅसिलिटी अ‍ॅंड अ फॅकल्टी. आपल्याला ती वापरता आली तर जगण्याची मजा काही और आहे.

मन एवहड एवहड
जस खसखसच दान
मन केवढ के वढ
आभायतिब मावेन

= पहिला विचार (किंवा कोणताही विचार) सूक्ष्मच असतो. एकदा विचार प्रवाहासारखे सलग झाले की आपण त्यात हरवतो आणि मग मन व्यापक आहे असं वाटायला लागतं.

देवा आस कस मन
आस कस रे घडल
कुठे जागेपनी तुले
अस सपन पडल

= मन हा निसर्गानं मनुष्याला बहाल केलेला अनमोल नजराणा आहे. बहिणाबाईंच्या काव्यप्रतिभेला दाद देतो पण मन म्हणजे देवाला पडलेलं स्वप्न नाही.... देव हा मनाला झालेला भ्रम आहे.