मन दुभंग वगैरे काहीही होत नाही फक्त विचार सैरभैर होऊ शकतात. तसं झालं तर व्यक्ती संभ्रमात सापडते आणि त्याला सायकॉलॉजीत स्प्लिट पर्सनॅलिटी किंवा विक्षिप्त मनोदशा म्हटलंय.

अर्थात, मनाच्या प्रक्रियेला जाणणारा, मनाशी तादात्म्य पावत नसल्यानं अशा अवस्थेत सापडू शकत नाही. ते सर्जन सारखं आहे, तो जोपर्यंत पेशंटमध्ये भावनिक दृष्ट्या गुंतत नाही तोपर्यंत त्याच्या मनावर कोणताही परिणाम होत नाही.

मुद्दा असा आहे की सर्जन पेशंटला टाळू शकतो, अति झालं तर प्रॅक्टीस बंद करू शकतो पण आपण मनाला टाळू शकत नाही. शरीराबरोबर मन अनिवार्यपणे आलेलंच आहे.

या परिस्थितीत मन अनिर्बंध न होता ऐच्छिक होणं हे जगणं सुखाचं होण्याचा एकमेव मार्ग आहे आणि अध्यात्माचा सारा प्रयास 'मनापलिकडे' जाण्याचा आहे. मनामुळे (किंवा सतत चालू असलेल्या विचार प्रवाहामुळे)  आपल्याला समोरचा निराकार दिसत नाही किंवा शांतता ऐकू येत नाही. बॅकट्रॅक ही प्रक्रिया तुम्हाला प्राथमिक ठेवीन मनाला दुय्यम करते आणि मनाची प्रक्रिया उलगडवते.

एकदा निराकार दिसला आणि शांतता ऐकू आली की आपण 'निराकार शांतता आहोत' हा बोध होणं क्रमप्राप्त आहे,  आणि त्याला सिद्धत्व म्हटलंय.