...हा आनंदाचाच प्रतिसाद आहे.
एखाद्या गोष्टीचा स्वीकार करणे वा नाकारणे हे ‘रुचिनाम् वैचित्र्यात्’ न्यायाने घडत असते. तथापि, ज्याच्या मनाचा गुंता सुटलेला आहे आणि स्वच्छ धारणा चित्तात रुजलेली आहे, त्याने त्याच्या दृष्टीने अस्वीकारार्ह असे काही वाचल्याने वा ऐकण्याने मनाचा गुंता वाढणार नाही, किंबहुना, त्याच्या चित्तात रुजलेली धारणा सुलाखून निघाल्याने अधिकच ठाम होईल; मनाचा गुंता वाढलाच तर मग चित्तात रुजलेल्या धारणेत कुठे तरी अशक्त बिंदू असल्याचे ते लक्षण ठरेल, असे मला वाटते.
चुकीच्या धारणा अशाश्वत असतात. तिथे पूर्ण सत्याचा अभाव असतो. पिढ्यानुपिढ्या त्या सांभाळल्या गेल्या असतील, तर त्यामागे ‘अंधसत्ता’ हे एकमेव कारण आहे, असे म्हणता येते. स्वीकारलेल्या धारणांच्या तपशीलामध्ये कालानुरूप बदल/सुधारणा होत गेल्या आहेत. तरीही, मूळ धारणा ‘सर्वव्याप्त, सर्वकल्याणकारी, अनंत निराकाराचे अस्तित्व’ ही धारणा बदललेली नाही.
सत्याचे ज्ञान स्वयंभू असते, हे खरे आहे. तसेच ते प्रत्येक जीवाच्या ठायी आहेच, हे आपले म्हणणेही अगदी खरे आहे. फरक एकच आहे की, सामान्यतः ते ज्ञान अव्यक्त राहते. बुद्धी भौतिक पातळीवरून उद्गतित होऊन तिने त्या ज्ञानाचे द्वार उघडावे लागते. निराकाराचे स्वयंभू ज्ञान अनावृत्त होणे प्रत्येकाच्या बाबतीत घडतेच, असे होत नाही.
आपोआप आणि व्यवस्थित चालणे, यात घडणे आणि मोडणे हे ही आलेच. तीही एक क्रियाच आहे. क्रिया, कर्म आणि कर्ता यातील एखादे पद अव्यक्त असले तरी अनुरोधाने अध्याहृत क्रियेचा बोध होत असतो. कर्ता आणि प्रेरणा हे दोन घटक, ते अव्यक्त असले तरी, अध्याहृत धरावे लागतात. त्यांच्याशिवाय कार्य घडत नाही, हा आपल्या जीवनातील सामान्य अनुभव आहे. जर एखादे कार्य घडण्याला कुणी/काही निमित्त होत असेल, तर ते अमर्याद निराकाराने अंतर्बाह्य व्याप्त असल्याने घडलेल्या क्रियेचा तोच कर्ता ठरतो, ते त्याचेच कार्य असते. सारे काही आपोआप आणि व्यवस्थित चालावे, ही त्याच निराकाराची मूळ इच्छा आहे आणि म्हणूनच तो जीवाच्या ठायी उद्भवलेल्या शक्तीला आधार देऊन तिच्याकडून सारे चालवून घेत राहतो.
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.