चारपाच दिवस संगणक उघडता आला नव्हता. आज उघडला तो ही मेजवानी समोर आली. सुंदरच वर्णन, 'पण पाऊस आवडत नाही ' याच्याशी असहमती. चिखल म्हणजे पाऊस नव्हे,खड्डे म्हणजे पाऊस नव्हे, वाहतूक खोळंबा, तुंबलेली गटारे म्हणजेही पाऊस नव्हेच. पाऊस म्हणजे उत्सर्ग. विसर्ग म्हणा हवे तर. मला तो विसर्जनाचा, विघटनाचाच आनंदसोहळा वाटतो. आकाशाने पोटात साचलेली माया उधळून टाकणे म्हणजे पाऊस. 'वाऱ्यावरती कण गंधाचे अलगद उधळित जावे' तसे आकाश पाऊस उधळते. मग खाली धरतीवर तुम्ही काहीही करा-सजा, भिजा, रुजा काहीही.
पावसाच्या अनेक आठवणी. घाटातल्या, मैदानावरच्या, किनाऱ्यावरच्या. एकदा माळशेज घाटात धारांखाली उभे असताना वरून एक   दगड  डोक्यावर येऊन आदळला होता. एकदा दमणला किनाऱ्यावर झापांच्या झोपडीत वाफाळत्या चहाचा घोट घेता घेता वरचे छप्परच उडून जाऊन पाऊस थेट कपातच उतरला होता आणि माझा प्याला  भरून गेला होता. एकदा शेताच्या बांधावरून  घसरताना अचानक एक लाल डोळ्यांचा आणि मातकट पंखांचा भारद्वाज मला आडवा आला होता. खरे तर त्याच्या उड्डाणमार्गात अनपेक्षितपणे मीच आडवी आले/झाले होते.  मुंबईतल्या २००५ सालच्या प्रलयातले सात तास तर विसरणेच शक्य नाही. तो जणू पुनर्जन्मच. ताडोबाच्या जंगलात चंद्रपूर-मूळ रस्त्यावरून आतमध्ये अतिथीगृह शोधताना किर्र काळोखी पावसात रस्ता चुकलो होतो आणि तुरळकपणे दिसलेल्या कुठल्याही वाहनास हात केला तर त्यातले लोक  घाबरून दुप्पट वेगाने वाहन पळवीत होते  तेव्हा गाडीतल्या काहींनी  रामरक्षा सुरू केली होती.
वगैरे वगैरे. पण हे सर्व जाउ दे. लेख आवडला हेच खरे सांगण्याजोगे.