यती हा एखाद्या ओळीत दीर्घ विराम घेण्यासाठी असतो असे मला वाटते. हे साधारणतः जास्त लांबीच्या वृत्तात होते. उदा. शार्दूलविक्रीडितात १९ अक्षरे असतात आणि १२ अक्षरांनंतर यती येतो. म्हणजे बारावे आणि तेरावे अक्षर एकाच शब्दात येऊ नये. ह्या यतिभंगाचे एक उदाहरण द्यायचे तर माझ्या संदिग्ध प्रेमाचे सुनीत ह्या कवितेचे देता येईल. (ओळखा पाहू कोठे आहे यतिभंग )
मात्र (वरच्या भुजंगप्रयातासारख्या) कमी लांबीच्या वृत्तात अशी कोठे आवश्यकता असते असे वाटत नाही. भुजंगप्रयातात अमूक जागी यती असावा अशी काही व्याख्या आहे काय? कृपया माहिती द्यावी.

लांबड्या वृत्तात येणारे यती गणांच्या सीमेवरच येतात असे नव्हे. शार्दूलविक्रीडितातला वर सांगितलेला यती गणसीमेवर  आहे (मसजस - ततग) हे खरे; पण स्रग्धरेत (म भ न त त ग ग)
मेघांच्या गर्जनेने .... खवळुनि वरती ... सिंह पाही स्वभावे
येथे पहिला यती सात अक्षरांनंतर तर दुसरा चौदा अक्षरांनंतर आलेला आहे. आणि दोन्हीही गणांच्या सीमेवर नाहीत.

यतीची योजना थांबण्यासाठी आहे गणव्याख्येचा थांबण्याशी संबंध नाही.  प्रत्येक गणसीमेवर यती आहे असे वाटू लागले तर वरील कवितेत (त्या परिस्थितीत) सा-वल्यांच्या, भो-वताली, स-ज्ज झाली, तुझे भा-स चोही - कडे पां - गलेले (! ) ... असे यतिभंगच यतिभंग दिसू लागतील.

छन्दोरचना (दुसरी आवृत्ती - अद्याप मनोगतावर उपलब्ध नाही) ह्या पुस्तकात पृष्ठ क्र. ६३ ते ६७ येथे यती विषयी ऊहापोह आहे, तो वाचावा.
चू. भू. द्या. घ्या.