'छंदोरचने'तील व पटवर्धनांच्याच 'पद्यप्रकाशा'तील ह्याविषयीचा ऊहापोह वाचून माझ्या डोक्यातील गोंधळ कमी होण्याऐवजी वाढला. पटवर्धन 'यतिविचार' ह्या भागात म्हणतात, "पद्य सलगपणे आणि लयानुरोधाने वाचीत असतांना जो न्यूनाधिक विराम काही ठिकाणीं घ्यावाच लागतो त्याला यति म्हणतात... यतिस्थानीं विराम घ्यावयाचा तो न्यूनाधिक असू शकतो" "न्यूनाधिक" शब्द पाहता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे यती दीर्घ विराम घेण्यासाठी असतो असेच नव्हे तर तो लहानसा विराम घेण्यासाठीही असू शकतो.
पुढे पटवर्धन असेही म्हणतात की चरणान्तर्गत यतीचे स्थान (त्याचे अस्तित्व मान्य असल्यास) कोणते ह्याविषयी मतभेद संभवतात. "आवर्तनी वृत्तांत यतिस्थान कोणते मानावें याविषयी पिड्.गलाचें काही निश्चित धोरण दिसत नाही." असे म्हणणार्या पटवर्धनांनी आपल्या विवेचनात ह्याविषयी स्वत:चेही कोणतेही निश्चित धोरण किंवा तत्त्वे मांडलेली दिसत नाहीत. "यति म्हणजे थाम्बणें. या थाम्बण्याच्या ठिकाणीं पद्याच्या सलगपणांत खण्ड पडतो.... यतीमुळे चरणाचे जे तुकडे पडतात त्यांवरून त्याची मोडणी कळायला साहाय्य होतें." हे अनावर्तनी वृतांबाबत पटण्यासारखे आहे. परंतु आवर्तनी वृत्तांत आवर्तनान्ती सलगपणात खंड पडतो असे वाचताना जाणवते.
टाळीचे ठिकाण व यती एकच नसले तरी टाळीचे ठिकाण लयदर्शक असते, व पटवर्धन स्वत: लिहितात की "पद्य सलगपणे आणि लयानुरोधाने (अधोरेखन माझे - मि. फ. ) वाचीत असतांना जो न्यूनाधिक विराम काही ठिकाणीं घ्यावाच लागतो त्याला यति म्हणतात". आवर्तनी अक्षरगणवृत्तांत हे टाळीचे ठिकाण "आरम्भापासून पाहातां ज्या अक्षरगणाची आवृत्ति दिसेल त्या अक्षरगणाच्या समाप्तीप्रमाणे (,) या चिन्हाने दाखविणें बरें वाटतें." असे असता यतीचा व टाळीच्या स्थानाचा काही प्रमाणात तरी संबंध असावा असे वाटते.
"...यती गणांच्या सीमेवरच येतात असे नव्हे" ह्या विधानाच्या पुष्ट्यर्थ तुम्ही शार्दूलविक्रीडित व स्रग्धरा ही उदाहरणे दिली आहेत. पण ती दोन्ही वृत्ते अनावर्तनी आहेत.
"यतीची योजना थांबण्यासाठी आहे गणव्याख्येचा थांबण्याशी संबंध नाही."