मला  काव्यप्रतिभा, काव्यलेखन किंवा काव्यवाचन यांचा 'अत्यंत' मर्यादित अनुभव आहे हे खालील प्रतिसाद वाचताना कृपया मनात ठेवावे, ही नम्र विनंती.

...म्हणजे गण आवर्तनानुसारही पडतात. अशा आवर्तनानुसार पडलेल्या गणांनी बनलेल्या चरणांत "सामान्यपणे" विराम आवर्तनांतीच येणे "स्वाभाविक" वाटते. ...

येथे आवर्तनानुसार पडणारे गण म्हणजे काय ते समजून घ्यावे लागेल असे वाटते. तशी 'व्याख्या' कुठे असेलही कदाचित.

भुजंगप्रयातात आवर्तनी गण आहेत हे खरे.  मात्र 'य' हा गण आवर्तनावरून पडलेला नाही. कोठल्याही वृत्तात (आवर्तनी वा अनावर्तनी) तो आल्यास तो तसाच असतो. उलट फार्सीतून आलेली वृत्ते आवर्तनी गणात असतात. त्यांचे गण ह्या तीनअक्षरी गणांनी दाखवल्यास आवर्तनी वाटणार नाहीत. त्यामुळे आवर्तनी 'गण' म्हणजे त्या त्या आवर्तनाची व्याख्या (किंवा दुसरे काही चांगले वाटले तर तो शब्द घ्यावा) उदा.

गालगागा गालगागा गालगागा गालगागा ... असे लिहिल्यास गालगागा हा गण आवर्तनाने आलेला आहे हे दिसते. आणि त्या त्या गालगागा नंतर यती येऊही शकेल (पुन्हा, यती केवळ ओळीत थांबण्याच्या उद्देशानेच घेतला जातो असे मला वाटते. ) भुजंगप्रयातात तो कोठे घ्यावा 'लागत' असेल असे वाटत नाही. पण समजा सुमंदारमाला (म्हणजे दोन भुजंगप्रयात पण एक शेवटचे अक्षर टाळून) वृत्त घेतले तर 'मराठी असे आमची मायबोली - जरी आज ती राज्यभाषा नसे ...' (कवी माधव जूलिअन) असे म्हणताना पहिल्या चार 'य' गणांनंतर यती 'घ्यावासा वाटतो'. मात्र ह्याच वृत्तात 'निघाले महाराज आले महाराज - झाला पुकारा सभामंडपी ... ' ('छत्रपती शिवराय' : कवी : यशवंत. तपशीलाबद्दल चू. भू. द्या̱. घ्या) ह्या ओळीत तो तेराव्या अक्षरानंतर 'घ्यावासा वाटतो'.

अशा अनेक कविता म्हणून पाहताना जास्त वेळ कोठे थांबावेसे वाटते त्यावरून हे नक्की ठरवता येईल असे वाटते. आणि अशा थांबावेसे वाटणाऱ्या ठिकाणी शब्द तोडायची वेळ येत असेल तर(च) त्याला यतिभंग म्हणावे असे मला  वाटते.

एका हिंदी गाण्याचे उदाहरण सांगण्यासारखे आहे.

वादा था जिन्हें हमदर्दी का - ख़ुद आके न पूँछा हाल कभी (गाणे : रहते थे कभी जिनके दिल में ..चित्रपट : ममता, संगीत : रोशन)

ह्या ओळीचा दुसरा तुकडा दोनदा वेगवेगळ्या लयीत म्हटलेला आहे. पहिल्या वेळी

ख़ुद आ - के न पूँ - छा हा - ल कभी

असा तीनदा यतिभंग झालेला आहे (असे मला वाटते). पण लगोलग त्यामागून

ख़ुद आके न पूँछा -- हाल कभी

असे म्हटल्याने कोठे यतिभंग (झालेला मला वाटत ) नाही. (तरीसुद्धा एखाद्या व्यक्तीला ही ओळ 'ख़ुद आके न पूँ ... छा - हाल कभी' असे म्हणून एक यतिभंग जाणवेलही! )