"मला काव्यप्रतिभा, काव्यलेखन किंवा काव्यवाचन यांचा 'अत्यंत' मर्यादित अनुभव आहे हे खालील प्रतिसाद वाचताना कृपया मनात ठेवावे, ही नम्र विनंती."
मला तुमच्याहूनही कमी आहे.तेव्हा आपण दोघेही ह्या चर्चाविषयासंबंधी आपापले ज्ञान, वाचन, अनुभव इत्यादी मर्यादित असल्याचा कॅव्हिऍट (मराठी प्रतिशब्द?) नोंदवून हा मुद्दा बाजूला ठेवूया.
छंदशास्त्र हा अभ्यासाचा विषय असलेले कोणी मनोगती असल्यास त्यांनी ह्या चर्चेत सहभागी व्हावे म्हणजे सर्वांनाच त्यांच्या सखोल शास्त्रीय ज्ञानाचा लाभ होईल. आता पुढे:
ह्या प्रतिसादातील तुमचे बरेचसे प्रतिपादन 'व्याख्या सुस्पष्ट नाहीत' ह्या माझ्या मूळ मुद्द्यास अप्रत्यक्षपणे पुष्टी देणारे आहे.
आवर्तनानुसार पडणारे गण म्हणजे काय हे पटवर्धन कोठेही उलगडून सांगत नाहीत. (निदान मला तरी त्यांची व्याख्या वा स्पष्टीकरण सापडले नही.) त्र्यक्षरी गण ही पिंगलाचार्यकृत पूर्णपणे कृत्रिम संकल्पना आहे ह्याविषयी दुमत असू नये असे वाटते. चरणांतील अक्षरसंख्या व लगक्रम थोडक्यात सांगण्याच्या तो केवळ एक प्रकारचा शॉर्टहॅन्ड (लघुलिपी) आहे. पटवर्धन म्हणतातच, "हे त्र्यक्षरी गण म्हणजे सदाच चरणाचे स्वाभाविकपणें पडणारे भाग असतात असे मुळीच नाही." म्हणजे पुन्हा सारे येऊन ठेपते ह्या धूसर 'स्वाभाविकपणा'वर. [अवांतर: मला अनेकदा हा प्रश्न पडतो की ह्या त्र्यक्षरी गणपद्धतीचा उपयोग काय? कॉलेजात आम्हाला शिकवले होते की ज्या वर्गीकरणाचा (क्लासिफिकेशनचा) डायग्नॉस्टिक (निदानीय) किंवा प्रॉग्नॉस्टिक (रोगाच्या संभाव्य वाटचालीविषयी काही भाकित करणारा) उपयोग नाही ते वर्गीकरण निरर्थक आहे. वर्गीकरणासाठी वर्गीकरण (क्लासिफिकेशन फॉर इट्स ओन सेक) करायचे तर कितीही आणि कसेही करता येते. ह्या यमाताराजभानसलगम् प्रकाराचे तसेच काहीसे झाले आहे का? त्याची एक भाकड असली तरी 'होली काउ' झाली आहे काय? ]
"आवर्तनी 'गण' म्हणजे त्या त्या आवर्तनाची व्याख्या "
मान्य. मग प्रश्न हा येतो की ही आवर्तने अशी का असतात? प्रत्येक आवर्तनान्ती एक अल्पसा का असेना, पण विराम असतो म्हणूनच ना? तसा तो नसता तर गालगागा गालगागा गालगागा गालगागा अशा ४ आवर्तनाऐवजी गालगागागालगागागालगागागालगागा असे सलगच उच्चारले असते.विराम म्हणजे जर यती, व यती "न्यूनाधिक" असू शकते तर आवर्तनान्ती यती का मानला जाऊ नये ह्याचे पटवर्धनांच्या विवेचनात उत्तर सापडत नाही.
"यती केवळ ओळीत थांबण्याच्या उद्देशानेच घेतला जातो. . . . अशा अनेक कविता म्हणून पाहताना जास्त वेळ कोठे थांबावेसे वाटते त्यावरून हे नक्की ठरवता येईल असे वाटते. आणि अशा थांबावेसे वाटणार्या ठिकाणी शब्द तोडायची वेळ येत असेल तर(च) त्याला यतिभंग म्हणावे असे मला वाटते."
यती म्हणजे थांबणे. परंतु ह्या थांबण्याचे कारण नेमके काय? चरणात अमुक ठिकाणीच थांबावेसे का वाटते? बोलताना श्वास घेण्यासाठी? हे कारण नसणार, नाहीतर प्रत्येक माणूस आपापल्या फुफ्फुसांच्या क्षमतेनुसार वेगळ्या ठिकाणी थांबेल. लय बिघडणार नाही, शब्द वेडावाकडा तुटणार नाही, योग्य व अर्थवाही शब्दपूर्ती होईल अशा स्थानी यतीचे ठिकाण असावे हे अधिक तार्किक व "स्वाभाविक" वाटते.
राहिला प्रश्न गाण्याच्या उदाहरणाचा, तर पद्याला लावलेल्या चालीवरून यती व यतिभंग ठरवायचा नसतो हे पटवर्धनांनी आपल्या ग्रंथांत सांगितलेले आहे.ह्याला कारण, "गवई हा हवी ती गोष्ट हव्या त्या तालांत म्हणू शकतो. कोणतेंहि अक्षर सोयीप्रमाणे लघु वा गुरु म्हणणें, वाटेल त्या ठिकाणी शब्द तोडणें, स्वर लाम्बवून मात्रांची संख्या भरून काढणें इत्यादि गोष्टींची त्याला मोकळीक असल्याने म्हणावयाचा भाग तो हवा तसा जुळवून घेऊन म्हणतो. पद्य षण्मात्रक आवर्तनाचे दिसलें तरी तो तें अष्टमात्रक आवर्तनाच्या पद्यासारखें म्हणू शकतो... गवई हा अनावर्तनी वृत्त सुद्धा जुळवून घेऊन तालांत म्हणू शकतो. सामान्य माणूस ही जुळवून घेण्याची, बसविण्याची यातायात करीत नाही. सरळ लिहिल्याप्रमाणे उच्चार करीत थोडेसें गळ्यावर म्हणायला लागतांच जें आवर्तन जाणवतें, जें अक्षरानुसारी असतें तेंच त्या पद्याचें आवर्तन होय..."