सुंदर... आवडले.
थोडे कल्पनारंजन... कथेला उत्तररंग देण्याचा विचार आला...
एका रात्री मी दवाखान्यात बसलो होतो. शेवटचा रुग्ण तपासून रिकामा झालो होतो. हात-पाय ताणून शीण घालवायचा प्रयत्न केला. घरी जाण्याच्या विचारात होतो. तेव्हढ्यात केबिनच्या दारावर टक-टक झाली. 'या, आत या... ' म्हणालो.
एक उंचा-पुरा इसम ‘थॅन्क्स्’ म्हणत आत आला. त्याच्या हालचालींवर माझी सराईत नजर फिरली. मी ओळखले... हा तोच, पण चेहरा गंभीर ठेवत त्याला प्रश्न केला, ‘सांगा, मी आपली काय सेवा करू शकतो?’
तो इसम त्याचा चेहरा निर्विकार ठेवण्याचा प्रयत्न करीत असावा, असे जाणवले. त्याने काहीशा उत्साहाने ‘आपले पोट दुखत आहे’ अशी तक्रार सांगितली. मी त्याला तपासण्यासाठी पडद्यामागच्या बैठ्या बिछान्यावर झोपावयास सांगितले. त्याला तपासले व उठून बाहेर येण्याची विनंती केली. मी अगोदर जाऊन माझ्या खुर्चीवर बसून झुलू लागलो.
काही मिनिटात तो इसम बाहेर आला नि समोरच्या खुर्चीत बसला. त्याची हालचाल पाहून माझी खात्री झाली... याची पोटदुखीची तक्रार खरी नाही.
त्या इसमाला मी म्हणालो... ‘मी आपल्याला तपासले आहे. पोटदुखीचे कुठलेही शारीरिक कारण मला दिसत नाही. हां, शक्यता एक आहे... कधी कधी आपल्या जवळच्या व्यक्तीच्या कल्याणासाठी आपण त्याच्या मनाला टोचेल असे वागतो... त्या व्यक्तीला आपण दूर करतो... ती व्यक्ती अतीव दुखावली जाते... तसेच दु:ख आपल्यालाही होतच असते. पण त्या व्यक्तीच्या आयुष्याला योग्य ते वळण मिळाले की आपल्याला फार आनंद होत असतो... तो आनंद आपल्याला लपवता येत नाही... आनंदाने जसे डोळ्यातून अश्रू येतात, तसंच काहीसं घडतं... झालेला आनंद पोटात मावेनासा होतो... तडस लागते... तसं काही तरी कारण असावं...’
समोरच्या इसमाच्या चेहर्यावर हंसू उमटले...
‘मला माहितंय्, मी काहीही वेषांतर केले तरी तू मला ओळखशील...’
मी स्वतःला थोपवू शकलो नाही. झटकन् उठलो नि भावनातिरेकाने त्या इसमाला मिठी मारली. त्याने माझ्या पाटीवर थोपटले... मला दूर करीत माझा हात धरून मला केबिनबाहेर घेऊन आला. त्याच्या हातात ऊब होती... माझे डोळे पाणावलेले.
बाहेर लटकावलेल्या ओव्हरकोटातून त्याने ती सिगारकेस बाहेर काढली... एक सिगार मला दिला... एक जिभेने किंचित् ओला करून आपल्या ओठात उजव्या बाजूस धरला... म्हणाला.. ‘तू पुन्हा सिगार ओढायला सुरुवात केलीय्... मला माहितंय्... तुला घरी जाताना सिगार ओढीत घोडागाडीत बसायला आवडते, हेही मला माहितंय्..’
बोलत असताना त्यानं लायटर बाहेर काढून हलविला... पेटवला नि माझ्या तोंडातील सिगारसमोर धरला. मी न बोलता सिगार शिलगावून घेतला. ‘थॅन्क्स्’ म्हणालो... त्यानं आपला सिगार शिलगावला नि तो लायटर अन् ती सिगार केस्... हो तीच, जी मी चोरली आहे, असे त्याने छातीठोकपणे पटवून मला घरातून हाकलून दिले होते... ती सिगार केस माझ्या हातात देत माझे हात थोपटत म्हणाला...
‘येत जा अधून मधून... मला एकटेपणाचा त्रास सहन करावा लागतोय्...’
आता त्याचे डोळे पाणावलेले... त्याने ओव्हरकोट डाव्या हातावर घेतला... हॅट् चढवली व तो इसम...जोन्स... तडक बाहेर पडला...
मी अवाक्...