हे तर काहीच नाही. एकदा 'कच्च्या नारळाचे उपयोग' अशा काहीश्या अगदी ठळक मथळ्याखाली 'लोकसत्ता'मध्ये शहाळ्याच्या उपयोगाविषयी माहिती होती. लेखात सर्वत्र 'कच्चा नारळ' असाच शब्दप्रयोग होता. कोवळासुद्धा नव्हे, कच्चा! सरळ सरळ 'टेंडर कोकोनट'चे भाषांतर आणि भाषांतरकर्त्याला 'कोवळा' शब्द माहीत नसणे! तसा 'जून' शब्दही अलीकडे कोणाला ठाऊक नसतो.
मराठीभाषाविषयक धागा आणि प्रतिसाद आहे म्हणून थोडे अवांतर : 'खोबरेल' या शब्दातच तेल हा शब्द संक्षिप्त रूपात अंतर्भूत आहे. खोबरे+ तेल=खोबरेल. जसे तीळ+तेल=तिळेल, एरंडेल, उंडेल (उंडीचे तेल), भिरंडेल(भिरंडाचे म्हणजे रतांब्याचे तेल) इत्यादि. त्यामुळे खोबरेल तेल ही द्विरुक्ती.