शेतकऱ्याचे उत्पन्न कमी असण्याच्या कारणांमध्ये आतापर्यंत
१. पावसाचे अगदी कमी किंवा जास्त प्रमाण - कमी पावसात कमी पीक त्यामुळे त्यापासून उत्पन्न कमी, चांगल्या पावसात चांगले पीक आले तरी त्यामुळे भाव पडून उत्पन्न कमी अशी परिस्थिती असते. कांद्याचे पीक जास्त आल्याने शेतकऱ्यांनी कमी भावात विकण्याऐवजी नाशिकजवळच्या घाटात कांदा फेकून दिल्याचे वाचले होते.
२. सावकारांचे व्याजाचे अवाच्या सवा दर - दरमहा दर शेकडा ५ पर्यंत म्हणजे द. सा. द. शे. ६० असा दर ऐकण्या - वाचण्यात आला आहे. या दराने कर्जफेड जवळपास अशक्य असते.
३. दलाल, अडते वगैरे लोक शेतकऱ्याची पिळवणूक करतात. सुमारे ३० वर्षांपूर्वी "सोबत" साप्ताहिकात "कोथिंबिरीचे गौडबंगाल" असा लेख वाचण्यात आला होता. एका शेतकऱ्याने दलालास १००० कोथिंबिरीच्या जुड्या पाठवल्या. त्यावेळी २५ पैशास एक जुडी या भावाने त्यांची किंमत २५० रूपये होती. दलालाने किती द्यावेत? दलालाच्या म्हणण्यानुसार सफाई, निवडणे, ट्रकभाडे वगैरे खर्च वजा जाता शेतकऱ्यानेच दलालास १०० रुपये द्यावेत.
४. सरकारी कामकाजानिमित्त सरकारी नोकरास लाच वगैरे द्यावी लागते.
अशी कारणे वाचली होती.
या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून फक्त सणावारी होणाऱ्या पक्वान्नांवर लेखकाचा रोख दिसतो तो दिशाभूल करणारा आहे. आणखी एक गोष्ट जी वर लिहिली नाही कारण ती सर्व शेतकऱ्यांना लागू होत नाही, पण काही शेतकरी दारूसारख्या (आणि इतरही काही) व्यसनांच्या नादी लागून पैसे खर्च करतात त्यावरही लेखकाचा आक्षेप नाही. काही लोक लग्नसमारंभासारख्या गोष्टी ऐपत नसताना कर्ज काढून खर्च करतात यालाही आक्षेप नाही. त्याचा आक्षेप फक्त धार्मिक कारणांनी लोक पंढरीची वारी करतात किंवा सणासुदीला घरात गोडधोड करून खातात यावर.
क्षणभर असे मानू की खरोखर सणासुदीच्या वेळेस शेतकऱ्याकडे पैसे नसतील. पण ज्यावेळेस पैसे येतात त्यावेळेस सणाला खर्च होणार म्हणून ते बाजूला काढून ठेवायला नकोत का? मुलीच्या लग्नासाठी किंवा मुलाच्या शिक्षणासाठी नाही का पालक वीस वीस वर्षे पैसे वाचवत? मुळात खर्च करता येतील इतके पैसेच नसतील तर मग सणांचे चक्र बदलल्याने काय फरक पडणार आहे?
खरेच लेखकाने एकदा सणासुदीला पक्वान्नांचे जेवण करण्यामध्ये शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा किती भाग खर्च होतो हा हिशोब काढावा. वर दिलेल्या कारणांनी किती पैसा कमी मिळतो किंवा इतर अनावश्यक गोष्टीत खर्च होतो याचाही हिशोब काढावा.
राहता राहिला प्रश्न पंढरीच्या वारीचा. शेतकऱ्याचे सर्वच्या सर्व कुटुंब कामधाम सोडून वारीला निघाले असे होत नाही. घरटी एखादा माणूस जातो आणि तो गेला तरी कामाचे फारसे अडत नाही.
सणांच्या निर्मितीमागचे ऐतिहासिक महत्त्व विशद करणारे पुराणशास्त्री काहीही म्हणोत, परंतु शेतीमधल्या मिळकतीचा संचय शेतकर्याच्या घरात होताच कामा नये, शेतकरी कायमच कर्जबाजारी राहावा हा उद्देश स्पष्टपणे डोळ्यासमोर ठेवूनच सणांची निर्मिती आणि रीतिरिवाज अगदी प्राचीन काळापासून नियोजनबद्धरितीने आखल्या गेले आहे, हे उघड आहे.
यावरून हा लेख कोणत्या उद्देशाने लिहिला आहे ते स्पष्ट होते.
विनायक