पंढरीची वारी पुरेश्या गांभीर्याने पार पडत असेलही पण आजकाल ज्या अनेक वाऱ्या, पालख्या निघू लागल्यात त्यांचे रूप बघता टाइमपास आणि मुक्ततेला आलेले उधाण(थोडक्यात हुल्लडबाजी) हेच जास्त करून अनुभवाला येते. मुंबईत दर सोमवारी रात्री प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला निघालेल्या पदयात्रिकांच्या झुंडीमधून आता भक्तिरस कमी होऊन हुल्लडबाजीचे प्रदर्शन होऊ लागले आहे. देवदर्शनाच्या नावाखाली मित्रमैत्रिणींसमवेत रात्रभर उनाडायचे, पहाटेची परतीची पहिली लोकल विनातिकिट पकडून मधल्या स्टेशन्स् वर उतरून धुमाकूळ घालायचा, हे लोक पुन्हा गाडीत चढण्यापूर्वीच जर मोटरमनने ठरलेल्या वेळी लोकल सुरू केली तर त्याला दमदाटी, मारहाण करायची हे आता सररास झाले आहे. शिरडीलाही आजकाल राजकीय पक्षांनी प्रायोजित केलेल्या यात्रा निघतात. पुष्कळ झोपडीनिवासी लोक त्यांत सामील होतात. परतल्यावर जर त्यांना विचारले की कशी काय झाली यात्रा, तर हमखास खूप मजा आली किंवा मज्जा केली अशीच उत्तरे मिळतात. पन्नासएक लोकांनी सवलतीच्या दरात चार दिवस राहाणे, खाणे यात त्यांना मजा वाटते. क्षणाचे देवदर्शन आणि चार दिवसांचा विरंगुळा/ टाइमपास असेच या यात्रांच्या बाबतीत झाले आहे.