सिद्ध होणे समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. उपचार करणाऱ्याने आपल्याकडे आलेल्या प्रत्येक रुग्णाची नोंद ठेवली आहे का?
गेल्या तीन वर्षात एकूण किती रुग्ण आले? त्यांची वर्गवारी काय आहे? म्हणजे वय, लिंग, रोगाचा प्रकार किंवा साप चावला की विंचू, चावणारा प्राणी कोणत्या जातीचा आहे याची उपलब्ध असलेली तपशीलवार माहिती, दंश शरीराच्या कोणत्या जागेवर झाला आहे, दंश किती खोल आहे, दंश होऊन किती काळ लोटला आहे, उपाययोजना काय, औषध किती मात्रेत, दिवसातून किती वेळा दिले वगैरे वगैरे.  

या माहितीचे विश्लेषण करून ८० टक्क्यापेक्षा जास्त रुग्ण जर बरे झाले असतील तरच ती उपाययोजना रुग्णहिताची आहे असे म्हणता येईल.

पारंपारिक उपचारपद्धतीत अशी माहिती ठेवण्यात येत नाही. शंभरापैकी किती रुग्ण मेले किती बरे झाले याचा काहीच थांगपत्ता लागत नाही. जर मेलेल्यांची संख्या जास्त असेल तर कसे कळणार? केवळ बऱ्या झालेल्या रुग्णांची माहिती तोंडी होणाऱ्या जाहिरातीत माऊथ पब्लिसिटीत दिली जाते. तसे ते लेखकाने आपल्या मातोश्रींचे उदाहरण दिलेले आहे. हे नक्कीच रुग्णहिताचे नाही. चिकित्सेला आलेल्या अपयशाची नोंद ठेवली नाही तर चिकित्सेत सुधारणा कशी करणार? चिकित्सा परिपूर्ण आहे आणि सुधारणेची गरज नाही असा तर लेखकाचा दावा नाही? तसा तो असेल तर तो दावा विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारा नाही.

वैद्यकीय उपाय न झाल्यामुळे सर्पदंश वा विंचूदंश होऊन मृत्यू पावलेल्यांची संख्या अगणित आहे. अशा रुग्णांच्या मृत्यू दाखल्यांवरून ती काही प्रमाणात काढता येईल. जर अशी माहिती उपलब्ध नसेल तर ती उपाययोजना रुग्णहिताची म्हणता येणार नाही. लेखकाने हा मुद्दा विचारात घेतलेला नाही असे वाटते.

बहुतेक वेळा दंशपीडित रुग्ण जेव्हा मांत्रिक उपचाराने बरे होतात तेव्हा दंश करणारा प्राणी बिनविषारी असण्याची शक्यता असते किंवा मनुष्य मरण्याइतकी विषाची मात्रा दंशपीडिताच्या शरीरात टोचली गेलेली नसते. त्यामुळे दंशपीडित मंत्रोपचाराने बरा होतो. असे बिनविषारी सर्पविंचू असलेल्या ठिकाणी मांत्रिक बोकाळले नाहीत तरच नवल.

कोकणात एका विशिष्ट जातीचा विंचू चावून लोक मृत्यूमुखी पडत. जवळपास वैद्यकीय मदत उपलब्ध नसल्याने दंशपीडित मांत्रिकांचे उपचार घेत. तरीही बहुसंख्य दंशपीडित काही तासातच मृत्यू पावत. डॉ. बावीस्कर यांनी या विंचूदंशावर औषध विकसित केले. त्याबद्दल डॉ. बावीस्करांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. हे औषध स्थानिक ग्रामीण आरोग्य केंद्रावर उपलब्ध केल्यापासून ८० टक्क्यापेक्षा जास्त दंशपीडित बरे होतात.

वैज्ञानिक घटनांना दोष देत अपवादात्मक अशा घटनांचे पुरेशी माहिती वा पुरेसे तपशील न देता स्वतःच्या निष्कर्षाला अनुकूल अशा अपवादात्मक घटनांची उदाहरणे देणे दिशाभूल करणारे आणि बुद्धिभेदाचा प्रयत्न करणारे आहे.  अशा वृत्तींविरुद्धच हे अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक आणि अनिस चळवळ आहे.

लेखकाने आपल्या मातोश्रींचे वैद्यकीय उदाहरण दिले आहे. त्यांचा आजाराचे मूळ मानसशास्त्रीय होते असावे असे वातते. तरी हे उदाहरण व त्यांचे प्रकाशचित्र देण्याचा उद्देश कळला नाही.

माझे लेखकाशी कोणतेही व्यक्तिगत वैर वा रागलोभ नाही. लेखकास मी ओळखत देखील नाही. तरी माझे लेखकाला आव्हान आहे की मी मनुष्य मरेल एवढे सर्पविष किंवा विंचूविष टोचून घेतो. लेखकाने कोणताही मांत्रिक आणून मला वाचवून दाखवावे. माझा मृत्यू झाल्यास लेखकाने मांत्रिकगिरी हे थोतांड आहे असे जाहीरपणे कबूल करावे.