शिक्षण हे एखाद्या व्यक्तीस कुठल्या विषयात विशेष गती आहे ह्याचे दर्शक आहे. ह्याचा अर्थ दूसऱ्या विषयात, क्षेत्रात त्या व्यक्तीस अजिबात गती नसेलच असे नाही. शिक्षणातील क्षेत्र, जसे अभियांत्रिकी, विज्ञान, कला, विधी इ. इ. इ. वेगवेगळ्या कारणांनी निवडले जाते. वडिलधाऱ्यांचा दबाव, तात्कालिक आवड, मिळू शकणारा पैसा आणि मानसन्मान तसेच आरामदायी आयुष्याच्या भ्रामक प्रतिमा इ. इ. इ. चा प्रभाव त्या निवडीवर असतो. पुढे अनुभवातून कांही भ्रम गळून पडतात किंवा आंतरीक उर्मी दुसऱ्या मार्गावर ढकलते. बौद्धीक क्षमता आणि कष्टांच्या आधारे माणूस, शिक्षणापेक्षा सर्वस्वी वेगळ्या मार्गावर यशस्वी होऊ शकतो.
शिक्षित आणि अशिक्षित माणसांमधील फरक असा की दोघांनाही सम बुद्धी असेल तर अशिक्षित माणसास फार मोठे क्षेत्र स्वतःस सिद्ध करण्यासाठी उपलब्ध असते. शिक्षित माणसास सिमित क्षेत्र उपलब्ध असते. उदा. बीकॉम झालेली व्यक्ती , बँकेत किंवा खाजगी क्षेत्रात लेखा विभागात जाते, बीए केलेली व्यक्ती शिक्षणक्षेत्रात, सरकारी खात्यात जाते. तर अभियांत्रीकी केलेले विद्यार्थी त्या त्या क्षेत्रात जातात. अशिक्षित माणसाला नोकरी मिळण्याची शक्यता जवळ जवळ शून्य असल्याने तो स्वतंत्र व्यवसायाच्या प्रयत्नात जातो. तिथे तो कांहीही करू शकतो. त्यासाठी फार मोठे क्षेत्र त्याला खुणावत असते. कोथिंबीर-मिरच्या-भाज्या विकण्यापासून यंत्रांचे सुटे भाग विकण्यापर्यंत तो कुठलेही क्षेत्र निवडू शकतो. शिक्षित आणि अशिक्षित दोघांनाही बुद्धीच्या बळावर त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात प्रगती करता येते. आर्थिक गणित मांडल्यास जास्त धोका पत्करून (असुरक्षिततेच्या सावटाखाली) अशिक्षित माणूस जास्त पैसा कमावतो.
हर्षद मेहताने २९ वेगवेगळे व्यवसाय करून पाहिले आणि शेवटी शेअरमार्केटात स्थिरावला, आर्थिक दृष्ट्या बहरला. त्याची हाव वाढली आणि त्याच्या उत्कर्षाला उतरती कळा लागली हा भाग वेगळा. पण २९ वेगवेगळे व्यवसाय हाताळून पाहण्याचा पर्याय आणि संधी त्याला त्याच्या शिक्षणाच्या अभावामुळेच मिळाली.
एक ऐकीव कथा आहे.
एका खेड्यात एका शाळेत दोन मित्र होते. एक हुषार तर दुसरा उनाड. उनाड मुलगा नापास होत होत मागे पडला. हुषार मुलगा शिकून सवरून मोठा सरकारी अधिकारी झाला. त्याला सरकारकडून मुंबईत जुहूला फ्लॅट मिळाला. पुढे कांही वर्षांनी तो उनाड मुलगा आयुष्यात अपयशी ठरून मुंबईत आपल्या मित्राला शोधत आला. दोघे भेटले. आणि त्या हुषार माणसाने त्या उनाड आणि अपयशी माणसाला राहायला आपल्या फ्लॅट मध्ये राहायला जागा दिली, दोन वेळचे जेवण दिले. ह्याने नाक्यावर टेबल टाकून पानपट्टीचे दुकान टाकले. हाताचा गुण म्हणा, बोलघेवडा स्वभाव म्हणा कांहीही असेल पण त्याचा तिथे जम बसला. मित्राकडून क्षुल्लक कर्ज घेऊन त्याने तिथेच पानाची टपरी टाकली. सर्व प्रकारची पानं विकत त्याने धंदा वाढविला. त्याच्या कडे मोठमोठे फिल्म कलाकार मुद्दाम पान घ्यायला यायचे. रात्री ३-४ पर्यंत त्याचे दुकान चालायचे. महागात महागातले पान रु २५००/- चे होते. पण पानपट्टी बनविण्यात त्याचा हातखंडा होता. एकदा त्याच्या हातचे पान खाणारा फिरून फिरून तिथेच यायचा. आज जुहूत त्याचा स्वतःचा फ्लॅट आहे. (आर्थिक प्रगतीबद्दल तर बोलायलाच नको.... ) तो मुंबईतला एक श्रीमंत पानवाला आहे. त्या हुषार माणसाला आपल्या ह्या मित्राचा अभिमान आहे. पण तोही अंतर्मुख होऊन विचार करतो.... खरा हुषार कोण? तो की मी?