विचारांची देवाणघेवाण आणि अन्य व्यक्तींवर प्रभाव पडण्यासाठी स्पष्ट शब्दोच्चार अत्यंत महत्त्वाचे. परवचा, स्तोत्रे, आरत्या वगैरे वगैरे नीट आणि शुद्ध शब्दोच्चारांसहीत म्हणण्याची सवय केली तर जीभेच्या, ओठांच्या आणि गालाच्या स्नायूंना व्यायाम मिळून वाणी शुद्ध होते. ह्याचा उपयोग फक्त मातृभाषेत होत नाही तर कुठलीही भाषा आपण शिकू त्यात तो होतो. ह्या शुद्ध वाणीला वाचनाची, माहितीची, ज्ञानाची जोड मिळाली तर ते व्यक्तीमत्व सर्वांना हवेहवेसे वाटते आणि अशा व्यक्तीची प्रगतीही होते. हाच मार्ग समृद्धीचा असतो.

वाणीच्या शुद्धतेची आवड आणि सवय लागली की आयुष्यातील इतर क्षेत्रातही माणूस शुद्धतेचा आग्रही बनतो. भाषा लिहीताना, बोलताना, संवाद साधताना तो शुद्ध असावा असा प्रयत्न राहतो. जी शुद्धतेची आवड वाणीत, भाषेत सहजतेने येते तीच वागण्यात, कृतीत उतरते. आणि व्यक्तीमत्व विकसित होत जाते.

म्हणून मुळात परवचा, स्त्रोत्र, आरत्यांना महत्त्व आहे. पण ते शुद्ध (शब्दोच्चार आणि अनुस्वार, विसर्गांच्या उच्चारा सहित) असेल तरंच फायदा. घाईघाईने वर्षोंवर्षे उरकलेला परवचा फायदेशीर कधीच ठरत नाही.