प्रस्तुत लेखकाचे काही मुद्दे पटण्यासारखे असले तरी वैचारिक पातळीवर काहीसा गोंधळ जाणवतो.
१. वैद्यकीय ज्ञान हे कोणत्याही एका वैद्यक पद्धतीपुरते किंवा एखाद्या व्यक्तीपाशी सीमित करता येत नाही. प्रत्येक पद्धतीने वा प्रत्येक व्यक्तीला त्यातले थोडे थोडे ज्ञान प्राप्त होते (कळते) हे मान्य करावे लागेल.
२. मात्र माणसाच्या जीवितासंबंधीचे शास्त्र असल्याकारणे त्याचे प्रमाणीकरण करणे अत्यावश्यक ठरते. ते न केल्यास होणारे परिणाम तीव्र आणि बदलता न येणारे आहेत. जसे की जीवितहानी. गावोगावी असणारे मांत्रिक अथवा वैद्य यांचे प्रमाणीकरण करणे सद्य स्थितीमध्ये जवळपास अशक्य आहे. प्रशासकीय यंत्रणेची ही व्यावहारिक बाजूदेखील समजून घ्यावी.
३. जादूटोणा विरोधी कायदा इतकी वर्षे न होण्यामागे अशा अनेक विषयांची गुंतागुंत हे कारण आहे हे कृपया लक्षात घ्यावे.
४. केवळ दोन कलमांना आक्षेप घेत ह्या कायद्यालाच चुकीचे ठरवणे योग्य वाटत नाही.
५. मुळात हा कायदा लोकशाही पद्धतीने आलेला नाही. त्याला अजून (६ महिन्यापेक्षा जास्त) वैधताही नाही. त्यामुळे आपल्या सुधारणा वा हरकती वैध पद्धतीने सरकारला कळवाव्यात हे योग्य.
६. अस्तित्वात असलेल्या अनेक कायद्यांचा गैरवापर केलाच जात नाही असा लेखकाचा समज नसावा ही अपेक्षा. जर तरीही ते कायदे अस्तित्वात आहेत, तर नव्या कायद्यांना त्या आधारे विरोध नको.
७. आपला प्रस्तावित कायदा अत्यंत आदर्शतावादी आहे. प्रत्यक्षात आणि व्यवहारात अशा कायद्याची अपेक्षा करणेही अतिशयोक्त आहे.
८. लेखकाच्या मतांचा (आणि त्यांच्या सामाजिक जाणिवांचा देखील) आदर ठेवून असे वाटते की बहुतांश उदाहरणांचा उल्लेख अनावश्यक आहे.

प्रस्तावित कायद्याला विरोध करण्याऐवजी त्यात आवश्यक सुधारणा करून घेतल्यास समाजास प्रगतिशील ठेवता येईल.