मनोवेधकमध्ये 'मिसळण्याचा डबा' दिसले आणि मी इतक्या जुन्या लिखाणापर्यंत पोहोचले.
आम्ही ह्याला 'फोडणीचा डबा' म्हणतो, काही जण 'मिसळणाचा डबा' म्हणतात तर काही जण पाळे -बोलीभाषेत पाळं- म्हणतात. आम्हाला नेहमी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे मोहरी, हिंग, हळद, जिरे, तांबडं तिखट, काळा(गोडा मसाला) आणि मेथ्या त्यात ठेवतो. (साबुदाण्याच्या खिचडीला लागणारं जिरं ह्यातून घ्यायचं नाही कारण ते उपासाला चालत नाही! 
पाळंवरून बालकमंदिरात शिकवलेलं एक गाणं आठवलं.
लाल लाल भडक? ती मी मिरची.
पिवळी पिवळी जरद? ती मी हळद.
आंबट आंबट चिंच? हो हो मीच.
मुलांना ज्याचे खूळ? तो मी गूळ.
पण वास कोणाचा? माझा हिंगाचा.
एक कोण राहिले बुवा? जी हजर मी ओवा.
जमली का सारी? झाली ना हजेरी?
जा बसा पाळ्यात, मसाल्याच्या मेळ्यात.