पाळे म्हटले की पंचपाळे आठवते. चटण्या, कोशिंबिरी, पंचामृत, लोणची असे डाव्या बाजूचे किरकोळ पदार्थ पंगतीत वाढण्यासाठी पाच वाडगे एका दांड्याभोवती  गोलाकार एकत्र जोडून तयार केलेले भांडे. मधल्या दांड्याला वरती टोकाकडे  कधी कमळाचा, कधी  खाली वळवलेल्या तीन अर्धवर्तुळांचा आकार. हे भांडे पंगतीत वाढताना ज्याच्याकडे  असेल त्या वाढप्याची धावपळ विचारायलाच नको. नखाएवढे का असेनात, पण पाच-पाच पदार्थ प्रत्येक ताटात वाढेपर्यंत बाकी सर्व 'सिंगल आय्टेम'वाले वाढपी ह्याला कधीच 'ओवरटेक' करून जात. हा मध्येच जागा अडवतोय म्हणून त्याच्यावर उखडतही. हा बिचारा आपले पंचक साजरे करीत पंगतीच्या शेवटाला पोचतोय न पोचतोय तोच सुरुवातीकडून 'अहो, पंचामृत आणा' अशी जोरदार हाळी येई. शिवाय वाडग्यातले पाच पदार्थ एकाच वेळी वाढून संपत नसत. एक जरी पदार्थ संपला तरी ह्याला स्वयंपाक-कट्ट्याकडे चकरा माराव्या लागत. अशा वारंवार माराव्या लागणाऱ्या चकरांमुळे हा अगदी घामाघूम होऊन जाई. त्यासाठीच की काय, याच्या खांद्यावर कायम एक पंचा असे. पंचा आणि पंचपाळे ही युती अगदी मनात ठसून राहिली आहे. पंगतींच्या जेवणावळींच्या काळात एसी नसत. भलेमोठे पंखेही नसत. त्यामुळे पापड, कुरडया वगैरे आपापल्या ताटातच राहत. दुसऱ्याच्या पानात किंवा जमिनीवर उड्डाण करीत नसत. 
 आता कार्यालये जाऊन हॉल आले आणि पंगती जाऊन बूफे आला.  अर्थात पंचपाळे हद्दपार झाले. नाही म्हणायला त्याची मिनी आवृत्ती पूजासामग्रीमध्ये हळदकुंकवासाठी किंवा पंचामृतस्नानासाठी आपले अस्तित्व टिकवून आहे.