प्रत्येकाची फोडणीची स्वतःची अशी एक खास पद्धत असते. माझी पद्धत पुढील प्रमाणे - प्रथम एखाद्या ताटात फोडणीत लागणारे साहित्य उदा. कढीलिंब पाने, मिरची (चिरून), लसूण (सोलून), कांदा (चिरून) वै. ठेऊन सगळी सिद्धता करायची. आयत्यावेळी शोधाशोध करू नये. मोहरी, हिंग वै. सुद्धा हाताशीच ठेवावे. फोडणी करणे कलात्मक काम आहे. घाई करू नये. धैर्याने, शांतपणे फोडणी करावी. विस्तव मोठा करून साऱ्या वस्तु तेलात ढकलू नयेत. बऱ्याच वस्तु जळण्याची वा काही वस्तु कच्च्या राहाण्याची शक्यता असते.  

आवश्यकेनुसार प्रमाणात तेल घेऊन मध्यम विस्तवावर तापण्यास ठेवावे. तापले असे वाटले की त्यात मोहरी घालून तडतडू द्यावी. तडतडण्याचा आवाज बंद होत आला की त्यात उडिद डाळ घालून ती जराशी मातकट (चॉकोलेटी) होई पर्यंत थांबावे. नंतर त्यात अनुक्रमे जास्त भाजायच्या/तळायच्या वस्तु एक एक करून आधी घालायच्या. उदा. शेंगदाणे, कांदा, लसूण, ओली मिरची इ. 

नंतर उष्मांकबिंदु कमी असणाऱ्या (पटकन जळू शकणाऱ्या) वस्तु उदा. कढीलिंब पाने, हिंग, जीरे, तीळ इ. एक एक करून घालावे. फोडणीतील वस्तु अवाजवी जळत आहेत वाटले तर विस्तव कमी करावा. कोणती वस्तु कधी घालावी हे अनुभवाने कळते. हळद सर्वांत शेवटी घालावी आणि ती व्यवस्थित तेलात तळली गेली पाहिजे नाहीतर कच्ची राहिलेली हळद पदार्थाची चव बिघडवते.

तळटीप - उत्तम फोडणी हाच कोणत्याही भाजीचा/आमटीचा/उसळीचा आत्मा असतो.