कथा आणि अनुवाद दोन्ही आवडले.  पण....
अनुवादातील काही वाक्यांची रचना हिंदी वाक्यरचनेप्रमाणे झाली आहे ती खटकली. उदा. शक्यता आहे की तो तरूण एक सुप्रसिद्ध लेखक, एक सनदी अधिकारी आणि इतर मान्यवर पाहुण्यांच्या मध्ये अवघडून जाईल. संभव आहे की त्या संध्याकाळसाठी त्याने कपडे उधार घेतले असतील आणि त्याला माहितही नसेल की अशा प्रसंगी काय बोलावे.  
इथे अमुक होण्याची शक्यता आहे, तमुक होण्याचा संभव आहे अशी वाक्यरचना हवी असे मला वाटते. शिवाय काही ठिकाणी परस्परसंबंधी नसलेली वाक्ये 'आणि' वापरून जोडली आहेत - उदा. आपण एकमेकांचे चुंबन घेतले आणि कोपऱ्यावरील ढोलताशांचा ठणठणाट पण त्यादिवशी आपल्याला सुरेल वाटत होता.
मूळ कथेत हे एकच वाक्य असले तरी अनुवादात त्याची 'आपण एकमेकांचे चुंबन घेतले.  कोपऱ्यावरील ढोलताशांचा ठणठणाटही पण त्यादिवशी आपल्याला सुरेल वाटला वाटत होता.' अशी दोन वाक्ये केली असती तर वाचायला जास्त बरे वाटले असते असे माझे मत.
बोली - लेखी भाषेच्या वापराबाबत कथेत सातत्य नाही. बहुतेक ठिकाणी लेखी भाषा वापरली आहे जे योग्यच आहे, पण काही ठिकाणी संवादेतर वाक्यात बोली शब्द आले आहेत, उदा. काजं-बटनं, ते टाळायला हवे होते. संवादात बोली वापरली असती तर ते जास्त चांगले वाटले असते - उदा.   "फुले महत्त्वाची नाहीत" ऐवजी "फुलं महत्त्वाची नाहीत". शिवाय प्लावर्स आर नॉट इंपॉर्टंट असे बहुतेक मूळ वाक्य असावे त्याचे फुले महत्त्वाची नाहीत असे रोखठोक भाषांतर न करता मी "जाऊ दे रे! फुलांचं काय घेऊन बसलास? " किंवा "असू दे. फुलांचं काही नाही एवढं" वा तत्सम बोलण्यात शोभतील असे शब्द व वाक्यरचना वापरून अनुवाद केला असता.
असो. मी अनुवाद तज्ञ नाही, पण माझी मते मांडली आहेत. एकंदर प्रयत्न आवडला.