माझ्या जन्माच्या वेळच्या ग्रहस्थितीचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही असा माझा दृढ विश्वास आहे. त्यामुळे ग्रहस्थिती दाखवणारी जन्मकुंडली हा एक भ्रम आहे. जन्मकुंडली म्हणजे माझ्या जन्मवेळी अज्ञानामुळे माझ्या पायात अडकवलेली दैववादाची बेडी आहे. या कुंडलीबाबत महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सवरकर, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, विनोबा भावे यांची मते माझ्या या मतांपेक्षा वेगळी नव्हती याचा मला अभिमान वाटतो. ग्रहस्थिती, मुहूर्त या गोष्टी समाजाला, व्यक्तीला अनेकदा गोत्यात आणणाऱ्या असतात, असे माझे मत आहे.
महाराष्ट्रातील सत्यशोधकी परंपरेचा मला अभिमान आहे. भारतीय घटनेत वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्वीकार हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य म्हणून सांगितले आहे. त्यानुसार अशा दैववादी संकल्पनांची होळी करणे आणि अशा प्रकारच्या अवैज्ञानिक, बाष्कळ आणि समाजाला घातक संकल्पनांना सतत  विरोध करणे  हे मी स्वतंत्र आणि पुरोगामी भारताचा नागरिक म्हणून माझे कर्तव्य समजतो.
मूल होणे ही स्त्री-पुरुष संयोगांतून होणारी एक नैसर्गिक क्रिया आहे. ग्रह-तारे वगैरे गोष्टींच्या त्याच्याशी तिळमात्र संबंध नाही. संततीसुख-म्हणजे होणारे मूल कसे वागेल, ते किती बुद्धिमान असेल, ते किती यशस्वी होईल या गोष्टी अनुवंशिकता, संस्कार, संगत, संधी यांवर अवलंबून
असतात.  ग्रहांचा त्यांच्याशी काही संबंध नाही.
'मनोगत' सारख्या विचारप्रधान मंचावर अशा प्रकारचे लेख लिहिणे हा स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात करण्याचा प्रकार आहे. तसे करायलाही हरकत नाही, पण हा व्यवसाय समाजाची दिशाभूल करणारा आणि समाजाला मागे नेणारा असल्याने अशा प्रकारांना सतत आणि तीव्र विरोध केला पाहिजे.