'विचार तर कराल? ' या पुस्तकात डॉ. नरेंद्र दाभोलकर लिहितातः
फलज्योतिषाच्या वैज्ञानिकतेच्या प्रचार करणाऱ्यांना एका सोप्या चाचणीचे आव्हान देण्यात आले. त्यांना सेकंदापर्यंत अचूक अशा दहा जन्मवेळा देण्यात आल्या. त्यांवरून त्यांनी कुंडली मांडायची व कोणती कुंडली स्त्रीची व कोणती पुरुषाची हे सांगायचे तसेच त्यातील जिवंत व्यक्ती कोण व मृत कोण हे सांगायचे. हे आव्हान तसे जुनेच आहे डॉ. अब्राहम कोवूरांनी हे आव्हान जाहीर करून काही दशके होऊन गेली. ते स्वीकारायला ज्योतिष हे एक शास्त्र आहे असे छातीठोकपणे सांगणाऱ्यांपैकी  अद्याप कोणीही पुढे आले नाही.
एका झटक्यात माणसाच्या कर्तृत्वाला खुडून नशिबाच्या हवाली करणारी कुंडली माणसाचा पुरुषार्थच नाकारते (पुरुषार्थ हा शब्द येथे लाक्षणिक अर्थाने घ्यावा) आणि असत्याला प्रतिष्ठा देते.
प्रत्येक लढाई मुहूर्तावर करणारी पेशवाई बुडाली आणि गोरा साहेब जिंकला हे कशामुळे? पत्रिकेचे छत्तीस गुण जमणाऱ्या आमच्या भगिनींच्या कपाळी वैधव्य येते आणि गोऱ्या मडमांचे संसार सुखाने तरतात हे कशामुळे? - म. फुले
आणि अगदी समजा वादाकरता आकाशातील ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो असे ग्रहित धरले तरी राहू या ग्रहाचे काय? मुळात हा ग्रहच अस्तित्वात नाही. भ्रमण कक्षांच्या काल्पनिक छेदन बिंदूंना राहू आणि केतू ही नावे दिलेली आहेत. जे अस्तित्वातच नाही ते मानवी जीवनावर परिणाम कसे करू शकेल?
वरील प्रतिसादात रोहिणीताई लिहितातः माझा जोतिषशास्त्रावर ५० टक्के विश्वास आहे. याचे कारण मला जे जे भविष्य सांगण्यात आले आहे ते ते सर्व खरे ठरले आहे.  अगदी परदेशगमनाचा योग आहे हे सुद्धा मला लग्ना आधी बरेच जणांनी सांगितले होते. कुंडलीचा अभ्यास जर दांडगा असेल तर सांगितलेले भाकीत खरे ठरते. अर्थात काही अपवाद आहेतच.
यातल्या शेवटच्या दोन विधानांतला विरोधाभास तूर्त सोडून देऊ. पण कुंडली, ग्रहदशा यातले काहीही न बघता काही सरधोपट विधाने करता येतीलः
: बालपण सर्वसाधारण सुखाचे. एखादे गंभीर आजारपण संभवते. पोटाच्या विकारांची काळजी घ्या
: शिक्षण समाधानकारक. करीयरमध्ये काही अडचणी येतील पण त्यावर मात कराल
: तुमच्या वयाच्या चाळीशीनंतर तुमच्या आई-वडीलांच्या प्रकृतीच्या कटकटी सुरू होतील. काळजी घ्या.
:आपल्या कष्टाचे चीज होत नाही असे वाटेल
: आपल्या बोलण्याने लोकांचे गैरसमज होतील. काळजी घ्या
: परदेशगमनाची संधी आहे.( यात श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतानही आले! )
कोणालाही ही भाकिते सांगितली तरी त्यातल्या किमान पन्नास टक्के व्यक्ती 'हे बरोबर आहे' असे म्हणतील!
शेवटी कुंडली, ज्योतिष आणि मानसिक आधार याबाबत. दारू पिणाऱ्या माणसाला दारुच्या नशेखाली असताना कमालीचा आत्मविश्वास येतो. दारुने त्याला प्रचंड मानसिक बळ मिळते. त्याच्या प्रश्नांचा विसर पडतो. मग दारू वाईट का? (दारुचे शरीरावर होणारे परिणाम तूर्त सोडून देऊ) तर दारू माणसाला वास्तवापासून दूर नेते. दारू माणसाला अविवेकी बनवते. दारुने प्रश्न सुटतात या भ्रमात माणूस राहिला की मग तो हे प्रश्न सोडवण्यासाठी काय करावे लागेल हा प्रश्न विचारायचे विसरतो. दारू माणसाला मानसिक गुलामगिरी देते.
ज्योतिष, भाकित, कुंडली याचेही असेच आहे असे मला वाटते.
त्यामुळे 'टोकाची मते' या शब्दप्रयोगाचे मी स्वागत करतो. समाजात आत्तापर्यंत जे काही बरे, विधायक, समाजाला प्रगत करणारे झाले आहे ते कधीतरी, कुठेतरी, कुणीतरी 'नाही' म्हणण्याचे धाडस दाखवले म्हणूनच. फलज्योतिष, कुंडली, पापपुण्य, कर्मकांडे या जोखडांतून समाजाला बाहेर काढायचे असेल, समाजाला अधिक चिकित्सावादी, विज्ञानवादी, विवेकवादी करायचे असेल तर मते टोकाचीच असली पाहिजेत.