आज घडीला अनेक लोक ज्योतिषाकडे जाऊन आपले भविष्य विचारतात हे खरे आहे. याचा अर्थ ज्योतिषी सांगत असलेली भाकिते खरी ठरतात यावर लोकांचा विश्वास आहे. असा विश्वास असण्याचे कारण लोकांना त्याचा प्रत्यय आला असला पाहिजे. माझ्या बाबतीत मला एक दोन वेळा तसा प्रत्यय आला आहे. आता हे सर्व थोतांड म्हणणाऱ्या आणि ज्योतिषांना आव्हाने देणाऱ्या लोकांपुढे एक आव्हान नेहमी असते ते म्हणजे थोड्या प्रमाणात का होईना पण ही जी भाकिते खरी ठरतात त्याचे नेमके कारण काय आहे ते लोकांना सांगायचे. अंधश्रद्धानिर्मूलनवाले अजून तरी याचे स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. सर्व ज्योतिषांची १००% भाकिते चूक ठरली आहेत असे होत नाही. खरे ठरण्याचे प्रमाण १५- २०% असेल, ३०% असेल, थोडेसे कमी किंवा जास्तही असेल, पण इतकी तरी भाकिते खरी व्हायची कारणे काय? सध्या तरी ज्योतिषविरोधकांच्या मते याचे कारण "काकतालीय न्याय" (कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ) असे आहे. ते सर्वसामान्य माणसाला पटणारे नाही.
खऱ्या अंधश्रद्धेचे (खरे तर शुद्ध मूर्खपणाचे) एक उदाहरण म्हणजे काही वर्षांपूर्वी गणपतीची मूर्ती दूध पिते ही बातमी पसरली होती ते. पण त्याचे खरे कारण "कॅपिलरी ऍक्शन" किंवा "केशाकर्षण" आहे हे समजल्यावर तो प्रकार एक दोन दिवसांमध्ये बंद झाला. भाकिते खरी ठरण्याच्या प्रकाराचे जर असे तार्किक स्पष्टीकरण अंधश्रद्धाविरोधक देऊ शकले तर आपोआपच ज्योतिष हे अंधश्रद्धा असल्याचे लोकांना पटेल.
हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अंधश्रद्धाविरोधक ज्योतिषाला "थोतांड" वगैरे म्हणत राहणार आणि सामान्य माणूस त्याकडे दुर्लक्ष करून ज्योतिषाकडे जात राहणार.
विनायक
जाता जाता - विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमालेत ज्योतिषावर घणाघाती टीका केली आहे. लोकमान्य टिळकांचा खगोलशास्त्राचा अचाट व्यासंग असला तरी फलज्योतिषावर अजिबात विश्वास नव्हता. असे असूनही ज्योतिषविरोधी लेखन करणाऱ्यांना त्यांची आठवण न येता फक्त जोतिराव फुल्यांचीच आठवण येते. कुठल्याही सुधारणेच्या बाबतीत टिळक, चिपळूणकरांची सोडा आगरकरांचीही आठवण न येता फक्त फुले, (किंवा शाहू महाराज किंवा आंबेडकर) अश्या चलनी नाण्यांची आठवण यावी याचे फारसे आश्चर्य वाटत नाही. असो.