१. हिंदी शिकवणं कमी करणं हा ह्यावरचा उपाय होऊ शकत नाही.
हे म्हणजे मला बोलायचं आहे म्हणून बाकीच्यांनी गप्प बसा किंवा कमी बोला म्हणण्यासारखं झालं.
घरात वगैरे बोलत असताना ठीक आहे पण बाहेर भाषांच्या जगात हे अव्यवहार्य आहे.
२. मराठीवर हिंदीचं आक्रमण होतंय हे खरं आणि हे आजकाल दूरचित्रवाणीवरच्या मूळ हिंदी जाहिरातींच्या मराठी
भाषांतरांवरून कळतंच आहे. काही उदाहरणं पहा, म्हणजे आता ह्या क्षणी सुचलेली बर का!
- पाच रुपयांचा "शिक्का" (केवळ ओठांची हालचाल सारखी दिसावी म्हणून केलेलं "नाण्या"चं भाषांतर)
- निभवा (निभाना-वचन वगैरे, मराठीत पाळा हा शब्द आहे ना? )
- जागा ग्राहक जागा (जागा हो ग्राहका जागा हो असं पाहिजे ना? )
- खिलवा (अहो मराठीत "खाऊ घाला" असा किती छान शब्द आहे... )
- स्वस्थ रहा (हिंदीत स्वस्थ म्हणजे चांगले आरोग्य, मराठीत स्वस्थ म्हणजे स्थिर.... जरा कुठे स्वस्थ बसू देत नाही ही कार्टी)
- मला तू का समजत नाहिएस ("तुम मुझे क्यों नही समझती हो" चं मराठीत भाषांतर... हिंदीत तुम मुझे समझो हे योग्य आहे पण मराठीत --तू मला समज हे हिंदीतलाच अर्थ हवा असेल तर चुकीचं आहे हो...)
- घोटाळा (मराठीतल्या ह्या शब्दाचा अर्थ गोंधळ, विशेषतः मनाचा झालेला-म्हणजे पत्ता वगैरे चुकला असेल, ४२१ चं ४१२ झाल्यावर... हिंदीत ज्या अर्थाने हा शब्द वापरतात त्या अर्थाचा मराठीत शब्द आहे "अपहार" चारा घोटाळा नव्हे चाऱ्यातला अपहार असं म्हणू शकतो... )
- गडबड (मराठीत--घाई, लगबग. पण हिंदीत ह्या शब्दाचा अर्थ मराठीतल्या "घोटाळा" ह्या शब्दाशी साधर्म्य दाखवेल. पण जाहीरातीतल्या हिंदी-टू-मराठीतही हा घोटाळा ह्या अर्थानेच वापरतात. उदा. मला वाटलंच होतं काहीतरी गडबड आहे म्हणून... मराठीत आपण कसा वापरतो.... काय रे फार गडबडीत आहेस वाटतं? )
- चला, मध्यप्रदेश (हिंदीत जिथे जायचं आहे त्या जागेचा फक्त उल्लेख चालतो आणि तो व्याकरणदृष्ट्या योग्य आहे. उदा मैं मंदिर (मंदिर को नव्हे) गया था....... रमेश कहां गये थे? .... पापा, वो मैं जरा दोस्त के घर (घर को, नव्हे)गया था. पण मराठीत मात्र जागेला प्रत्यय लागतो. म्हणजे चला, मध्यप्रदेशला... असं म्हटलं पाहिजे.... मी देऊळ जाऊन येतो हे हास्यास्पद आहे, मी देवळात जाऊन येतो, नाही का? ))
ही फक्त काही उदाहरणे आहेत. आता अशी मराठी मुलांच्या कनावर वा डोळ्यावर पडली तर......
आता अजून एक गोष्ट,
हिंदीतले काही शब्द मराठीत जसेच्या तसे आणण्यापूर्वी हे अवश्य पहायला हवं की त्याच उच्चाराचा शब्द मराठीत अगोदरच आहे का?
असल्यास त्याचा अर्थ काय आहे. तो हिंदी शब्दाच्या अर्थाचाच आहे की त्याचा अर्थ वेगळा आहे. वगैरे.
बरेच शब्द असे आहेत म्हणूनच हा सगळा असाअ उफराटा कारभार होतो आहे.
इंग्रजीच्या अशा वापराचा परिणाम होत नाही असं नाही पण त्यामुळं मराठी ऍज सच बिघडत नाही. पूर्ण मराठी वाक्याच्या ऐवजी इंग्रजीयुक्त मराठी ऐकायला मिळतं. (उदा. त्यामुळं मराठी ऍज सच बिघडत नाही. आता ह्यात "ऍज सच" असा मराठीत शब्द नाही त्यामुळं हास्यास्पद किंवा वेगळं वाटत नाही. पण समजा तसे काही शब्द इंग्रजीत असतील तर त्यांचा वापरदेखील जपूनच करावा लगेल नाहीतर परत तेच......