फारच घाईघाईने निष्कर्ष काढून केलेली विषयाची मांडणी, वाचकांपर्यंत आशय पोहोचविण्यात, तोकडी पडली आहे.

>>>>या स्त्रीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात असलेली प्रजनन शक्ती; जी अन्य कोणामध्येही नाही.

प्रजनन शक्ती कुठल्याही मादी जवळ असते फक्त स्त्रीपाशी  (मनुष्य प्राण्यातील मादीपाशीच) नाही.

>>>>एक स्त्री जेव्हा दुसऱ्या स्त्रीच्या सहवासात येते तेव्हा इतर भावनांपेक्षा वैरत्वाची भावनाच तिच्यात असल्याचे आपणास प्रकर्षाने जाणवते.

आई-मुलगी, दोन सख्ख्या बहिणी, दोन घनिष्ट मैत्रीणी, दोन अनोळखी बायका ह्या प्रत्येक नात्यात वैरत्वाची भावना असते?

>>>>आईला स्वतःच्या मुलाच्या प्रेमात वाटेकरू नको असतो, तर सुनेला नवऱ्याच्या प्रेमात वाटेकरू नको असतो

वाटेकरू पेक्षा आपल्या अधिकार क्षेत्रातील दुसऱ्याचा हस्तक्षेप जास्त जाचक वाटत असतो त्यातून संघर्षाची ठिणगी पडते.
सेवानिवृत्त बाप आणि नोकरीकरून घर चालविणारा मुलगा ह्यांच्यातही हा प्रकार घडताना अनेकदा पाहिलेलं आहे.

>>>>इकडे सुनेला वाटतं की माझं सारं सोडून नवऱ्यासाठी या घरात आले तेव्हा हे सारं माझ्याचं हक्काचं आहे.

सुनेला असे वाटत असेल तर ती तिची मोठी चुक आहे. सून आली म्हणजे घरातील सर्वांनी आपापले हक्क सोडून सर्वाधिकार तिच्या चरणी वाहिले पाहिजेत अशी जर एखाद्या सुनेची अपेक्षा असेल तर ती अत्यंत अपरिपक्व विचारसरणीची आहे असे मानावयास हरकत नाही. त्यामुळे हा झगडा स्त्रीत्वातून नाही तर सुनेच्या अपरिपक्वतेतून निर्माण होणारा आहे. हक्क आणि कर्तव्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपले कर्तव्य करीत जावे हक्क मिळत जातात. जर कोणी सुनेकडून नुसत्याच कर्तव्यांची अपेक्षा करीत असेल तर तेही चुकिचे आहे.

>>>>अशा पतीत स्त्रियांचा उद्धार करायचं म्हटलं तरी किती स्त्रियांचा प्रतिसाद मिळेल? नगण्या! अगदी माझ्या सहित...

भावना कितीही उदात्त असली तरी ध्येय सहज साध्य नसते. 'त्या' स्त्रीची इच्छा त्या दलदलीतून बाहेर पडण्याची असावी लागते, त्या व्यवसायातील गुंडगिरीचा सामना करणे सर्वसामान्यांना शक्य नसते, ह्या सर्वावर मात करून, त्या दलदलीतून, एखादीला बाहेर काढले तरी ती पुन्हा स्वेच्छेने किंवा नाईलाजाने त्या व्यवसायाकडे वळणारच नाही ह्याची खात्री देता येत नाही. नुसत्या स्त्रीत्वापेक्षा अनेक इतर शक्ती ह्यात कार्यरत असतात.

>>>>कितीही नाही म्हटलं तरी १०० पैकी ९५% स्त्रियांना/मातांना/सासवांना मुलगाच हवा असतो.

टक्केवारी कुठल्या आधारावर काढली आहे कळत नाही. सर्वांना मुलगाच हवा असेल तर मुलांना जन्म द्यायला स्त्री आणायची कोठून? फक्त ५ टक्के स्त्रीयांनी मुलींना जन्म दिला आणि प्रत्येक स्त्रीने द्रौपदी सारखे ५-५ नवरे केले तरी ७०-७५ टक्के पुरुष लग्नविरहीत राहतील आणि मग त्या समाजाचा समतोल कसा राहिल? एखादा मुलगा हवा असणं साहजिक आहे पण फक्त 'मुलगाच' हवा असणं घातक आहे.
ज्यांना 'मुलगेच' असतात त्यांना 'मुलगी नाही' म्हणूनही हळहळताना पाहिलं आहे. सारांश इथेही लेखातील 'स्त्रीत्वाचा मुद्दा' अपयशी ठरला आहे.