कृष्णकुमारजी तुमचे दोन्ही प्रतिसाद उत्तम आहेत. पहिल्या प्रतिसादात वर्णन केलेलं दिव्य मराठी भाषांतर रोजच ऐकतो. खरंच कोणालाच त्यात काही चूक वाटत नाही याचं वाईट वाटतं. मी अनेकदा वाहिन्यांच्या संचालकांना मेल केले आहेत पण कोणी कानावरच घेत नाही. हिंदी शिक्षण बंद करून काहीच फायदा नाही. कारण ते चांगलं हिंदी दाखवतात पण मराठीत भाषांतर करणारे जर मराठीच्या बाबतीत काटेकोर नसतील तर असंच होणार. मुळात भाषांतरकाराला दोन्ही भाषा अवगत हव्यात. पेक्षा दोन्ही भाषांवर त्याचं प्रभुत्व हवं. ज्या भाषेचं भाषांतर करायचं आहे ती आणि ज्या भाषेत भाषांतर करायचं आहे ती. पण सगळाच आनंद आहे. मुळात आजकाल मराठी माध्यमातलं शिक्षण कमी झाल्यामुळे मराठी मातृभाषा असणारी मुलंच इतकं भयंकर मराठी बोलतात की ऐकवत नाही. याचं एक कारण असं असू शकेल की आजकाल इंग्रजी माध्यमात मराठी शिकवायला बरेचदा अमराठी शिक्षक असतात. दुसरं एक कारण असंही असू शकेल की मुलांच्या दोन पालकांमधला एकजण अमराठी असतो. आमच्याच घरात हे उदाहरण आहे. माझा एक पुतण्या यंदा ११ वीत आहे. मागच्या वर्षी मराठी शिकायला तो माझ्याकडे आला. त्याची आई रजपूत. ती मराठी बोलते. पण तिने चांगलं बोललेलं मराठीही शुद्ध अर्थातच नसतं. फक्त ती आवर्जून मराठी बोलते. त्या मुलाला 'गारवा' हा शब्द माहित नव्हता. त्याचं मराठीही हिंदीप्रचूर. शेवटी मी त्याला म्हणाले की तुझी आई मराठी बोलते त्याचं कौतुकच आहे पण तिची भाषा मराठी नाही. पण तुझं तसं नाही. तुझी भाषा मराठी आहे. तेव्हा तू असं मराठी बोलायला नको. ज्या मुलाला मराठीत ५०च्या जवळपास मार्कं मिळत होते त्याला बोर्डाच्या परीक्षेत मराठीत १०० पैकी ७८ मार्कं मिळाले. त्याच्या आई-वडिलांनी मला भरपूर धन्यवाद दिले. मुद्दा असा की अशा अनेक अडचणी येतात पण निदान मराठी भाषा शिकवायला मराठीच शिक्षक असावेत. आता असाही मुद्दा उपस्थित होऊ शकतो की कोणतं मराठी शुद्ध मानायचं? तर त्याचं उत्तर असं की व्याकरणातले जास्तीतजास्त नियम पाळून जे मराठी बोललं किंवा लिहिलं जातं ते अर्थात शुद्ध मराठी.