संस्कृत संगणकासाठी खूप अनुकूल भाषा आहे हे मत केवळ चुकीचेच नाही, तर "संगणक व भाषा" या बाबत पूर्ण अज्ञान दखाविणारे आहे, तसेच वास्तवा कडे पूर्ण डोळेझाक करणारे आहे. हे मत मांडणार्यांनी आधी हे सांगावे कि असे मत मांडण्या करता संगणक या विषयात त्यांचे क्रेडेन्शियल काय आहेत. म्हणून आधी माझे क्रेडेन्शियल सांगतो.
१. शाळेत जेवढे संस्कृत शिकवितात ते, व मी शाळेत असतानाच्या काळी भारतीय विद्या भवन संस्कृत भाषेत काही परीक्षा घेत असत (अजून घेतत का माहीत नाही) त्यातील तीन परीक्षा उत्तीर्ण.
२. संगणक प्रोग्रॅमिंग करता FORTRAN, BASIC, Pascal, C++, Java या भाषां मध्ये पारंगत. १९९० च्या दशकात Turbo Pascal नावांची एक सिस्टम खूपच वापरात होती, आता मागे पडली, या भाषेत ऍडवान्स्ड प्रोग्रॅमिंग करणार्यां करता एक पुस्तक लिहीले. (व चार हजार प्रतीं खपल्या, रॉयल्टी पण मिळाली)
आता पुढे. प्रोग्रमिंग करण्या करता ज्या अनेक भाषा आहेत, त्या रूढ अर्थाने "भाषा" नाहीतच. FORTRAN मध्ये कविता लिहीता येत नाही, C++ मध्ये "आज भाजी खारट झाली आहे" असे सांगता येत नाही व Java मधे शिव्या देता येत नाहीत. संगणकाला आदेश देण्या करता काही मोजकेच शब्द असतात. FORTRAN 77 मध्ये शब्दांची संख्या केवळ ३९ येवढीच होती. फक्त ३९ शब्दांची भाषा !!
हे शब्द वापरण्या करत काही काटेकोर नियम असतात, ज्याला सिंटेक्स असे म्हणतात. या प्रमाणे जो आदेश तयार होतो त्याचा कोणत्याही भाषेतील वाक्याशी काहीही साम्य नसते. उदाहरणार्थ FORTRAN भाषेतील हा आदेश IF(FQ23K)51,120,121
याचा अर्थ आहे, - FQ23K या वेरिएबल ची वॅल्यू तपासा, जर ती निगेटिव असेल तर 51 क्रमांकाच्या आदेश कडे जा; जर वॅल्यू शून्य असेल तर 120 क्रमांकाच्या आदेश कडे जा व जर वॅल्यू पॉझिटिव असेल तर 121 क्रमांकाच्या आदेश कडे जा, व मग ते आदेश जे काय असतील तसे करा.
यात IF हा शब्द इंग्रजी आहे येवढे सोडले, तर यात तुम्हाला इंग्रजी, मराठी, जर्मन, स्वाहिली किंवा उर्दू कुठे दिसले? आणि IF या शब्दा ऐवजी "जर", "यदी", किंवा "अगर" हे शब्द वापरले तर ते प्रोग्रमिंग मराठी, संस्कृत किंवा उर्दू झाले असे म्हणता येईल का?
तरी सुद्धा क्षण भर असे मानले कि संगणक वापरण्या करता संस्कृत ही काही प्रकारे जास्त उपयुक्त आहे, तर मग आज पर्यंत तसे कोणी केले का नाही ? संस्कृत वर काय आपला पेटंट किंवा कॉपीराईट आहे कि ज्या कारणे मायक्रोसॉफ्टला संस्कृत वापरण्यास बंदी होती ? उगाच आपले काही तरी . . . .कै च्या कै :-) जे काही आपले त्याच्या मोठेपणाच्या असल्या भोंदू कल्पना विलासातून आपण कधी बाहेर पडणार ?