भाषा व लिपी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. संस्कृत भाषेतील वाक्ये रोमन/ उर्दू/ कोणत्याही लिपीत लिहीता येतात. तसेच रोमन किंवा देवनागरी लिपीत इंग्रजी/ हिंदी/ एस्किमो/ . . . कोणत्याही भाषेतील वाक्ये लिहीता येतात. अमूक एक भाषा संगणका करता उपयुक्त आहे किंवा नाही आहे, हे दोन्ही चुकिचे आहे, कारण संगणक प्रोग्रमिंगच्या भाषांचा मनुष्याच्या बोल-चालीतील  भाषांशी काहीही संबंध नाही. या वर आधीच लिहून झाले आहे. राहिला प्रश्न लिपीचा. तर  देवनागरी लिपी स्क्रीन वर / प्रिंटर वर उमटवण्या करता कोण यातायात करावी लागते, या वरून देवनागरी किती संगणक फ्रेंडली आहे याचे आकलन व्हावे.

संगणका करता संस्कृत किंवा देवनागरी जास्त उपयुक्त आहेत या दंतकथेचा जन्म कसा झाला हे मला माहीत नाही. माझा असा अंदाज आहे कि कोणी परदेशी सन्मानीय पाहुणा कधी भारतात आला असताना त्याला भाषणात यजमान देशाच्या बद्दल काहीतरी चांगले बोलायची गरज पडली असावी व त्याने संगणका करता संस्कृत किंवा देवनागरी जास्त उपयुक्त आहेत असे फेकून दिले असावे. जसे आपण कोणा कडे गेलो कि त्यांच्या भसाड्या अवाज्याच्या बाळ्याच्या बेसूर गाण्याचे "किती सुंदर गातो" असे कौतुक करतो, किंवा त्यांच्या शकूने कॅन्वास वर सारवलेल्या रंगाच्या फर्राट्यांचे "किती छान चित्र काढते" असे कौतुक करतो, तसेच त्यांनी  "संगणका करता किती छान भाषा आहे" असे कौतुक केले असावे, व भूतकाळात रमणार्या व हजारो वर्षांपूर्वी आपण  किती ग्रेट होतो यात(च) धन्यता मानणार्या आपल्या समाजाने ते खरे समजले असावे.