सदरहू विषय चर्चेस टाकण्याचा उद्देश मुख्यत्वे श्री. धारुरकर यांनी संस्कृत भाषा ही "मायभाषा(म्ह.बऱ्याच भारतीय भाषांची जननी)" समजण्यावर घेतलेला आक्षेप हा आहे. त्यांच्या लेखाचे शीर्षकही "भाषेचं मायपण"हेच आहे.श्री चेतन पंडित हे संस्कृत व संगणक या दोन्ही विषयांचे जाणकार असल्याने त्यानी "संस्कृत ही संगणकास अनुकूल असणे" हा गैरसमज आहे असे म्हटले आहे.मी स्वतःही संस्कृत भाषा व संगणक यांचा तज्ञ नसलो तरी दोन्हींमध्ये थोडीफार गती असणारा आहे त्यामुळे "संस्कृत व संगणक "संबंधाविषयी मलाही शंकाच वाटते‌. संस्कृत देववाणी समजतात म्हणजे ती देवांची भाषा आहे असा निष्कर्ष काढून त्यावर धारूरकरांनी हल्ला केलेला अयोग्य आहे असे मला वाटते. तसे आपल्या लिपीलाही आपण देवनागरी म्हणतो, म्हणजे ती देवांनी वापरली असा अर्थ त्यातून निघत नाही. (देवांनी काही लिखाण केल्याचे ऐकिवात नाही)‌ संस्कृत ही शुद्ध भाषा आहे असा स्वतः धारुरकरांनीच उल्लेख करून त्यावर टीका केली आहे. प्रत्यक्षात संस्कृत अतिशय व्याकरणशुद्ध भाषा आहे व त्यात शब्दांची कशीही जुळणी केली तरी अर्थ बदलत नाही ही निर्विवाद सत्य गोष्ट आहे‍. जर्मन भाषाही तशीच आहे असे मी जे थोडेफार जर्मन शिकलो त्यावरून वाटते. अर्थात येथे विषय जर्मन भाषेचा नाही. मनोगतींकडून संस्कृत भाषेच्या "मायपणा" विषयी अधिक प्रतिक्रिया अपेक्षित होत्या.
"अक्षर" च्या संपादकांना मी विरोप पाठवला पण त्यांनी त्याची दखल घेतली नाही. अंकात श्री धारुरकर यांचा पत्ता किंवा विरोपपत्ताही नव्हता त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधता आलेला नाही.