कोणत्याही भाषेचा, या चर्चेच्या दृष्टीने मराठी भाषेचा, अयोग्य वापर न होण्यासाठी तशी निकड व त्याविषयीचे पूर्ण भान या दोन गोष्टी आवश्यक आहेत आणि मराठी भाषकांमध्ये या दोन्ही गोष्टींचा पूर्ण  अभाव आहे .मागेच मी एका चर्चेत उल्लेख केल्याप्रमाणे आपण मराठी भाषक भाषेच्या वापराबद्दल इतके सहिष्णू असतो की समोरची व्यक्ती मराठी भाषक नाही असा नुसता वास आला की आपण लगेच हिंदीत बोलायला लागतो. त्याला मराठी येत असले तरी ! मुंबईला गेले की टॅक्सीवाल्याशी बोलायला आपण सुरवात हिंदीतच करणार . कोठल्याही कार्यालयात गेले की चुकतमाकत इंग्लिशमध्येच बोलायचा प्रयत्न करणार. आता शिवसेनेच्या प्रभावामुळे त्याचे प्रमाण थोडे कमी झाले आहे.आपले मराठी नेतेसुद्धा दूरदर्शनवर प्रतिक्रिया व्यक्त करताना धेडगुजरी हिंदीतच बोलणार म्हणजे मराठी वाहिनी असली तरी. कारण आसेतुहिमाचल जनता त्यांचे शब्द कानावर पडण्यासाठी आतुर झालेली असते ना ? (आणि त्यांना इंग्लिशतरी कुठे चांगले येते ?) याउलट दाक्षिणात्य अथवा बंगाली नेते कोठेही ठणकावून त्यांच्याच भाषेत प्रतिक्रिया देणार गरज असेल तर दूरदर्शन अथवा वाहिनीने त्याचे भाषांतर करावे. त्यामुळे मराठी भाषेचे वाटोळे करण्यात आपणच इतके पुढाकार घेत असताना हिंदीवर त्याचे खापर फोडणे कितपत योग्य ?